• Wed. Nov 13th, 2024
    फिश फूड स्टॉलवरुन आक्रमक पवित्रा; सरवणकर दारात येताच कोळी महिलेचा संताप; पिटाळून लावलं

    Sada Sarvankar: विधानसभा निवडणुकीचा प्रचार करणाऱ्या आमदार सदा सरवणकर यांना माहीम कोळीवाड्यात रोषाचा सामना करावा लागला आहे. एका महिलेनं त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यास जेमतेम आठवडा राहिला आहे. त्यामुळे प्रचारानं वेग धरला आहे. उमेदवार मतदारांच्या गाठीभेठी घेत आहेत. पाच वर्षात न दिसलेले काही आमदार आता थेट मतदारांच्या दारात जात आहेत. काही ठिकाणी मतदारांकडून आमदारांना जाब विचारला जात आहे. माहीमचे आमदार सदा सरवणकर यांना प्रचारावेळी महिलांच्या संतापाचा सामना करावा लागला. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माहीम मतदारसंघातून सदा सरवणकर यांना संधी दिली आहे. सरवणकर माहीमचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्यासमोर मनसेचे अमित ठाकरे आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या महेश सावंत यांचं आव्हान आहे. सरवणकर यांच्या माघारीसाठी भाजपच्या नेत्यांनी बराच आग्रह धरला. पण शिंदेंनी त्यांची उमेदवारी कायम ठेवली. आता सरवणकर यांनी मतदारसंघात प्रचार सुरु केला आहे. या दरम्यान त्यांना माहीम कोळीवाड्यात महिलांचा रोषाचा सामना करावा लागला.
    Uddhav Thackeray: काय उघडायचं ते उघडा, नंतर मी उघडतो तुम्हाला! ठाकरे संतापले, वणीत बॅग तपासणीवरुन तणातणी
    फिश फूड स्टॉल का हटवले, असा थेट सवाल एका कोळी महिलेनं प्रचारासाठी दारात आलेल्या सरवणकरांना केला. तुम्ही फिश फूड स्टॉल का हटवले? आमच्या मुलांना चौकीत का नेलं? अशी प्रश्नांची सरबत्तीच महिलांनी केली. त्यावर फिश फूड स्टॉल सुरु करतो, असं म्हणत सरवणकर यांनी वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. त्यावर कधी सुरु करणार, असा प्रश्न महिलेनं विचारला.

    Sada Sarvankar: फिश फूड स्टॉलवरुन आक्रमक पवित्रा; सरवणकर दारात येताच कोळी महिलेचा संताप; पिटाळून लावलं

    फिश फूड स्टॉल हटवले. आमच्या पोटाचा प्रश्न आहे, असं महिला संतापून म्हणाली. तुम्ही लाडकी बहीण सांगता, आम्ही कोणत्या लाडकी बहिणी आहोत, असा प्रश्न महिलेनं केला. यावेळी सरवणकर यांच्यासोबत असलेल्या कोणीतरी त्यांना पुढे चला असं म्हटलं. ते ऐकताच कोळी महिलेचा पारा आणखी चढला. काय नाय पुढे जायचं.. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आधी, असं महिला म्हणाली. सरवणकरांनी महिलेची समजूत काढत घरात जाण्याचा प्रयत्न केला. त्यावर नाय नाय तुम्ही बाहेरच राहा, असं म्हणत महिलेनं सरवणकरांना घरात येऊच दिलं नाही. यानंतर आसपासच्या महिलादेखील आक्रमक झाल्या.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed