• Sat. Sep 21st, 2024

धांगडधिंगा घालणाऱ्या पबवर कारवाईचा हंटर, मेहरबानी दाखवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनाही खरमरीत इशारा

धांगडधिंगा घालणाऱ्या पबवर कारवाईचा हंटर, मेहरबानी दाखवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनाही खरमरीत इशारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पोलिसांच्या नियमावलीचे उल्लंघन करून पहाटेपर्यंत ‘मद्यधुंद’ धांगडधिंगा घालणाऱ्या हॉटेल आणि पबवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असून, त्यांच्यावर मेहेरबानी दाखविणाऱ्या स्थानिक पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचीही गय केली जाणार नाही, असा खरमरीत इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी दिला.‘कल्याणीनगर येथील दोन पब रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिक करतात, मग संबंधित पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि रात्रगस्त अधिकाऱ्यांच्या निदर्शनास कसे येत नाही,’ असा सवालही त्यांनी केला असून, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले.

मतदानाच्या टक्केवारीसमोर सलग सुट्यांचे आव्हान; मतदानावर परिणाम होण्याची भीती, उमेदवार चिंतेत
कल्याणीनगर येथील ‘एलोरा’ व ‘युनिकॉर्न’ या दोन पबवर रात्री दीडनंतरही मोठमोठ्या आवाजात साउंड सिस्टीम वाजवून रहिवाशांना त्रास दिल्याप्रकरणी गुन्हे शाखेने सोमवारी कारवाई करून, पाच जणांवर गुन्हे दाखल केले. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. ‘हा प्रकार आम्ही गांभीर्याने घेतला आहे. पोलिसांच्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल व पबवर कारवाईचा आदेश पोलिस ठाण्यांना दिला आहे. त्यानंतरही स्थानिक पोलिस ठाण्यातील कर्मचारी त्यांच्यावर मेहेरबानी दाखवित असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे त्यांची जबाबदारी निश्चित करावी लागेल,’ असे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

पोलिस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यावर अमितेश कुमार यांनी शहरात कर्णकर्कश संगीताच्या तालावर हुक्क्याच्या धुरात मद्यधुंद रात्र जागविणाऱ्या हॉटेल-पबचालकांना कडक नियमावलीची वेसण घातली. शहरातील हॉटेल, रेस्तराँ, पब यांना रात्री दीड वाजेपर्यंत कायद्याच्या चौकटीत राहून व्यवसाय करण्याची परवानगी दिली. मात्र, काही हॉटेल व पबचालक या नियमावलीला केराची टोपली दाखवून पहाटेपर्यंत धांगडधिंगाणा घालत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यावर पोलिस आयुक्तांनी बेशिस्त हॉटेल व पबवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास त्याचा फटका पोलिस ठाण्याच्या प्रभारींनाही बसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed