आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला मुंबईत दोन जागा मिळाव्यात, अशी भूमिका मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. यात प्रामुख्याने उत्तर-मध्य मुंबईसह दक्षिण-मध्य मुंबई काँग्रेसला मिळावी, अशी पक्षाची मागणी होती. मात्र, दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघासाठी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) उमेदवार अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे त्या जागेऐवजी मुंबई काँग्रेसला उत्तर मुंबईची जागा देण्यात आली आहे. ही जागा निश्चित करताना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना विचारात न घेतल्याने त्यांनी दिल्लीत पक्षनेतृत्वाकडे राज्यातील नेतृत्त्वाविरोधात नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
दरम्यान, बुधवारी या जागासंदर्भात पुन्हा बैठकांचे सत्र सुरू असल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून देण्यात आली. दिवंगत शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजश्री घोसाळकर यांनी वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन उत्तर मुंबईतून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. गायकवाड यांनी घोसाळकर यांना ही जागा सोडण्यास काहीच हरकत नसून, त्याबदल्यात काँग्रेसला जागा मिळेल का, असा प्रतिप्रश्न केल्याचेही कळते. गायकवाड यांनी उत्तर मुंबई शिवसेनेला सोडण्यास आधीपासून तयारी असल्याचे स्पष्ट करत उत्तर-मध्य आणि दक्षिण-मध्य या दोन जागांवर काँग्रेस लढण्यास आग्रही असल्याचेही सांगितले. मात्र, जागावाटप जाहीर झाल्याने उमेदवारीवर आता निर्णय केवळ संबंधित पक्षश्रेष्ठीच घेणार असल्याने याविषयीचा निर्णय उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हायकमांडच घेऊ शकते, असेही गायकवाड यांनी घोसाळकर यांना सांगितल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या भेटीनंतर घोसाळकर या आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेण्यास गेल्या. मात्र, या भेटीत काय झाले, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.