आज मुंबई येथे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गटा)ची तिसरी यादी जाहीर झाली. यात महाआघाडीचे उमेदवार म्हणून विधान परिषदेचे आमदार, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपने आज दहावी यादी जाहीर करूनही सातारा लोकसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेवर ठेवले आहे.
भेटीसाठी वेटिंग, तिकीट जाहीर होत नसल्याने हुरहूर
दिल्ली येथे गेल्या दहा दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी उदयनराजे यांची बैठक झाली. मात्र त्यांची भेट घेण्यासाठी उदयनराजे भोसले यांना चार दिवस वेटिंग करावे लागले होते. चार दिवसानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व खासदार उदयनराजे भोसले या पाच नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर अमित शाह, उदयनराजे भोसले, अजित पवार या तिघांमध्ये चर्चा झाली. अखेर अमित शहा यांनी उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब केले. परंतु भाजपच्या देशातील उमेदवारांच्या दहा याद्या प्रसिद्ध झाल्या तरी उदयनराजे भोसले यांचे नाव यादीत नसल्याने त्यांना हुरहूर लागली असून पत्रकारांच्या उमेदवारीच्या प्रश्नांला त्यांनी जाणीवपूर्वक बगल दिली.
मविआने छत्रपती शाहू महाराजांना घरी जाऊन उमेदवारी दिली, त्यांचे अभिनंदन
महायुतीच्या कराड येथील मेळाव्यासाठी खासदार उदयनराजे भोसले आले असताना, भाजपच्या याद्या जाहीर होऊनही देखील तुमची उमेदवारी अद्यापही जाहीर होत नाही, याबाबत पत्रकारांनी विचारल्यावर मोठ्या लग्नाच्या याद्यांना वेळ लागतोच. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवाराचे नावही लवकरच जाहीर होईल, असे ते म्हणाले. त्याचवेळी महाविकास आघाडीकडून कोल्हापूरच्या शाहूराजेंच्या उमेदवारी दिल्याचा प्रश्न विचारल्यावर उदयनराजे म्हणाले, मी कोणाला विरोधक मानत नाही. वैचारिक मतभेद असू शकतात. प्रत्येकाची विचारधारा वेगवेगळी असते. लोकशाही आहे. मविआने छत्रपती शाहू महाराजांना घरी जाऊन उमेदवारी दिली, त्यांचे अभिनंदन करतो, असे ते म्हणाले.
भाजपकडून उदयनराजेंची सत्वपरीक्षा, उदयनराजेप्रेमींची खंत
दिल्लीहून आल्यानंतर उदयनराजे यांनी ‘आरंभ है प्रचंड’ ही टॅगलाईन घेऊन साताऱ्यात दमदार एन्ट्री मारल्यापासून जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे. एकीकडे महायुतीकडून उमेदवारी मिळणार या दृष्टिकोनातून उदयनराजे जिल्हा पिंजून काढत आहेत. अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी ते घेत आहेत. मात्र, आजच्या दहावी यादीची प्रतीक्षा संपल्यानंतरही उदयनराजेंची दिल्ली दरबारातून सत्वपरीक्षा घेतली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. अजून किती दिवस नाव जाहीर करण्यास वेळ घेणार आहेत? असा प्रश्न उदयनराजेप्रेमी करू लागले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख १२ असून आता उमेदवारीच्या घोषणेची प्रतीक्षा सर्वांना लागून राहिली आहे.