• Sat. Sep 21st, 2024
सांगलीत वसंतदादा पाटलांचे वारसदार स्वाभिमानी बाणा दाखवणार?

सांगली: एके काळचा काँग्रेसचा बालेकिल्ला, अशी ओळख असणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्या वेळेला काँग्रेसचा हात निवडणुकीच्या रिंगणातूनच हद्दपार झाला आहे. मागील वेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मतदारसंघ दिला तर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हा मतदारसंघ हिसकावून घेतला. सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने गमावल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड प्रमाणात संताप आहे. निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीसमोर निदर्शने करून घोषणाबाजी केली. त्यानंतर आता काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्याकडून राजीनाम्याचे अस्त्र उपसण्यात आलं आहे.
राज ठाकरे वाघ माणूस, मात्र त्यांचा कोल्हा करायचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला, विजय वडेट्टीवारांची सडकून टीका
सांगलीची जागा ही ठाकरे गटाकडे गेल्यानंतर सांगलीतील पदाधिकाऱ्याने आता राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसची ओबीसी विभागाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. विवेक बाबुराव गुरव आणि काँग्रेसचे ओबीसी विभागाचे सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्ष आप्पासाहेब खोत आणि यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशाल पाटील हे सक्षम उमेदवार आहेत त्यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. निर्णय बदलावा आणि काँग्रेससाठी ही जागा सोडण्यात यावी, अशी ही मागणी यावेळेस पदाधिकारी करत आहेत.माजी मंत्री विश्वजीत कदम युवा नेते विशाल पाटलांसाठी प्रयत्न करत होते. परंतु त्यांना यश आलं नाही. सांगली जिल्ह्यात काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. मागच्या वेळी देखील स्वाभिमानीसाठी ही जागा सोडण्यात आली होती. यावेळेस देखील ही जागा सोडली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते सांगली जिल्ह्यात भाजपची संघर्ष करत आहेत. काँग्रेसच्या प्रदेश आणि केंद्रस्तरावरच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्तापर्यंत स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना त्यांना पाठबळ देण्याऐवजी पाठ दाखवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना, अशी अवस्था काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची झाली आहे.

साताऱ्यात जलमंदिर मधील आई भवानी देवीचं दर्शन घेऊन उदयनराजेंनी उभारली नववर्षाची गुढी!

माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंत दादा पाटील यांच्यापासून त्यांच्या नातवापर्यंत काँग्रेस पक्षात संघर्ष करावा लागत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी प्रतिभाताई पाटील यांना प्रदेशाध्यक्ष करावे, अशी शिफारस केली असताना काँग्रेसच्या तत्कालीन हायकमांडने परस्पर प्रभा राव यांना प्रदेशाध्यक्षपद दिले होतं. त्यावेळी संतप्त झालेल्या वसंतदादांनी मुख्यमंत्रीपदाचाच राजीनामा दिला होता. आता तर थेट वसंतदादा घराण्यालाच काँग्रेसच्या वरिष्ठांनी एक प्रकारे सांगली जिल्ह्यातून हद्दपार केल्याची स्थिती निर्माण झाली आहे. आता वसंतदादांचे वारसदार हे वसंतदादांच्या सारखा स्वाभिमानीपणा दाखवत राजीनामा अस्त्र उपसतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed