• Mon. Nov 25th, 2024
    होय मी मोदींवर टीका केली पण चांगल्या कामाचं कौतुकही केलं, मनसेचा बिनशर्त पाठिंबा: राज ठाकरे

    मुंबई : येणारी लोकसभा निवडणूक देशाची भविष्य ठरवणारी आहे. देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळेच केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. मी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली असेल, लाव रे तो व्हिडीओ म्हणत त्यांच्या भूमिकांना विरोध केला असेल पण त्यांना माझा व्यक्तिगत विरोध कधीच नव्हता, असे सांगायला ते विसरले नाहीत. त्याचवेळी मनसैनिकांनी थेट विधानसभेच्या तयारीला लागावे, असे आदेश राज यांनी दिले.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून आल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महायुतीला पाठिंबा देतील, अशी अटकळ बांधली जात होती. अखेर मंगळवारी झालेल्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा करून दीर्घकाळ चाललेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी अमित शाहांची भेट, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे अध्यक्ष होण्याच्या चर्चा, जागावाटपावरून येणाऱ्या प्रतिक्रिया अशा मुद्द्यांवरून जोरदार फटकेबाजी केली.

    “नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी मी गुजरातचा दौरा केला. तेथील विकासकामे पाहिली. तिकडून आल्यानंतर मी मोदींनी भारताचे पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा बोलून दाखवली. ज्या माणसाकडून आपल्या अपेक्षा असतात आणि त्यांच्याकडून काही कामे होत नाहीत किंवा त्यांच्या काही भूमिका पटत नाही, त्यावेळी टोकाचा विरोध होता. मी देखील तसा टोकाचा विरोध केला. पण ज्यावेळी त्यांनी चांगले काम केले (राममंदिर, कल ३७०, सीएए) त्यावेळी मी त्यांचे अभिनंदन देखील केले. सध्या देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे कोणत्याही अटींशिवाय पक्षाचा मोदींना पाठिंबा असेल” असे राज म्हणाले.

    घाऊक पक्षांतरावर राज ठाकरेंचा आसूड

    आज कोण कोणत्या पक्षात आहे, हे कळेनासे झाले आहे. आज हाणामारी चालू आहेत. पुढच्या विधानसभा निवडणुकीत कोथळे बाहेर काढतील. व्याभिचाराला राजमान्यता देऊ नका, जर ती मिळाली तर पुढचे दिवस भीषण आहेत, अशी विनंती त्यांनी महाराष्ट्रातील मतदारांना केली. पण दुसऱ्या बाजूला त्याच घाऊक पक्षांतरातून तयार झालेल्या सरकारला त्यांनी पाठिंबा देऊ केल्याने त्यांची दुटप्पी भूमिका अधोरेखित झाली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *