• Sat. Sep 21st, 2024
रुग्णालयातील रुग्णांना मिळणार का मतदान करण्याचा हक्क? रुग्णांसह नातेवाइकांसाठी मतदान सुविधेची मागणी

मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी यंत्रणा भरीव प्रयत्न करत आहे. ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना निवडणूक आयोगाच्या यंत्रणेमार्फत घरूनच मतदान करण्याची सुविधा आहे. त्याच धर्तीवर, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण तसेच त्यांच्यासोबत असलेले त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक यांनाही मतदान करता यावे, यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने सुस्पष्ट मार्गदर्शक सूचना देणे गरजेचे आहे. अशा सूचना मिळाल्या, तर संबंधित यंत्रणांना मतदानकेंद्रांच्या उभारणीसाठी प्रयत्न करता येतील, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.महापालिकेच्या रुग्णालयामध्ये सुमारे साडेदहा हजार, तर खासगी रुग्णालयांत साडेसहा हजार खाटा आहेत. महापालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये अंदाजे दोन हजार खाटांची उपलब्धता आहे. दुर्धर, संसर्गजन्य आजारांसाठी दीर्घकाळ उपचार घेणाऱ्या ५५०हून अधिक रुग्णांना रुग्णालयामध्ये उपचार दिले जातात. खासगी व सार्वजनिक आरोग्य यंत्रणेमध्ये दाखल असलेले रुग्ण आणि नातेवाईक यांच्यामध्ये मतदारसंख्या ७०० ते एक हजार असू शकते, याकडे तज्ज्ञ लक्ष वेधतात.

शाळापूर्व तयारी अभियानाचे ‘पहिले पाऊल’,पहिलीतील विद्यार्थ्यांच्या पालकांचे प्रशिक्षण

मात्र त्यांना ‘पोस्टल बॅलेट’ वा पूर्वसंमती प्रक्रियेने अर्ज करून मतदान करण्याचा अधिकार अद्याप देण्यात आलेला नाही. मुंबईध्ये मतदानाचा टक्क वाढावा, यासाठी समाजमाध्यमांपासून पथनाट्यापर्यंत विविध प्रकारे जनजागृती केली जात असली, तरी हे मतदार मतदानाच्या प्रक्रियेतून सुटणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर बोलताना या मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली. निवडणूक आयोगाचे या मुद्द्याकडे लक्ष गेले, तर त्यावर तोडगा निघू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक मतदारसंघातील रुग्णालयामध्ये किती रुग्ण आहेत, त्यानुसार त्या क्षेत्रासाठी केंद्रांची उभारणी करण्याची शक्यता तपासून पाहता येऊ शकते. मात्र रुग्णालयनिहाय मतदानकेंद्रांची उभारणी करणे व्यवहार्य नाही. रुग्णासह त्याच्यासोबत राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांनाही काही वेळा मतदानाचा हक्क बजावता येत नाही. त्यांना तो हक्क बजावता यावा, यासाठी सामाजिक तसेच आरोग्याच्या मुद्द्यांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी रुग्णांना एक दिवसासाठी सोबत द्यावी, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये ‘स्वीप’ समितीतर्फे मतदारांमध्ये जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम राबवण्यात आले. त्यावेळी रुग्णालय प्रशासनासाठी मतदानकेंद्रे उपलब्ध करून देऊ, असे सांगण्यात आले. मात्र ती केंद्रे वैद्यकीय कर्मचारी तसेच डॉक्टरांसाठी असतील, असेही कळते.

‘एक मतही वाया जाऊ नये’

खासगी रुग्णालयांची संख्या व तिथे उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता, मतदानादिवशी रुग्णांसाठी ही सुविधा असायला हवी, असे आग्रही मत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राष्ट्रीय आरोग्य योजना विभागाचे अध्यक्ष डॉ. जयेश लेले यांनी व्यक्त केले. शहरातील ज्या भागामध्ये रुग्णालय आहे, त्याच परिसरातील रुग्ण-मतदार तिथे उपचार घेत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकही मत वाया जाऊ नये, या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे.

संसर्गजन्य आजारांबाबत सुविधा

संसर्गजन्य आजार असलेल्या रुग्णांना दीर्घकाळ वेगळ्या रुग्णालयांमध्ये ठेवण्यात येते. रुग्णालयामध्ये किती प्रौढ रुग्ण दाखल आहेत, याची व्यवस्थित माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली, तर ही प्रक्रिया सुलभ करता येईल, याकडे सामाजिक आरोग्य अभ्यासक विनोद शेंडे यांनी लक्ष वेधले.

कुष्ठरुग्णांसाठी विशेष नोंद

कुष्ठरुग्णांची बोटे अनेकदा आजारामुळे झडलेली असतात. अशा रुग्णांच्या डाव्या वा उजव्या हातापैकी ज्या बोटांना व्याधीची लागण झालेली नसेल, त्या बोटावर मतदान केल्याची नोंद केली जाते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed