• Sat. Sep 21st, 2024
सचिन साठेंच्या हाती मशाल, ठाकरेंनी ५ मतदारसंघात गणित जुळवलं

मुंबई : एकीकडे पक्ष फुटला, संघटनेला गळती लागली, कैक निष्ठावंत पलटले, पण दुसरीकडे ठाकरे गटात प्रवेशाची रांग काही कमी होताना दिसत नाही. निष्ठावंतांची फळीच सोडून गेली असताना नव्या दमाच्या चेहऱ्यांनी ठाकरेंचे हात मजबूत केले. त्यातच अण्णा भाऊ साठेंचे नातू सचिन साठेंनीही उद्धव ठाकरेंची मशाल हाती घेतली आहे. अण्णा भाऊ साठेंच्या नातवाचा पाठिंबा मिळवून उद्धव ठाकरेंनी सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न केला. पण सचिन साठेंची नेमकी ताकद किती आहे, आणि उद्धव ठाकरेंना मातंग फॅक्टरचा फायदा कसा होणार?

अण्णा भाऊ साठेंच्या समाजिक आणि प्रबोधन चळवळीचा वारसा घेऊन सचिन साठे राजकारणात उतरलेत. मात्र, मोठ्या संधीच्या आणि आधारवडाच्या शोधात असलेल्या सचिन साठेंना आता मोतश्रीची सावली मिळाली आहे. ठाकरे आणि साठे या दोन्ही घराण्याला मोठा इतिहास आहे. महाराष्ट्राच्या राजकीय लढाईसाठी ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीला साठेंच्या पुढच्या पिढीने साथ दिली.
धक्कादायक! तरुणीने सिगारेटचा धूर तोंडावर सोडला, तरुणाने व्हिडिओ बनवला; संतापात दोघींनी मित्राच्या साथीनं युवकाला संपवलं
सचिन साठे कोण आहेत ?
सचिन साठे हे अण्णा भाऊ साठेंचं पुत्र संजय साठेंचे चिरंजीव आहेत. २०१० पासून सचिन साठे सामाजिक कार्यात सक्रिय असून आजोबांचा सामाजिक वारसा जपण्यासाठी सचिन साठेंकडून राज्याबाहेरही व्याख्यानांचे कार्यक्रम झाले आहेत.

मातंग समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज एकजूट करण्याचे सचिन साठेंनी प्रयत्न केले आहेत. मातंग समाज परिवर्तन अभियानातून सचिन साठेंनी संघटन वाढवलं. २०१७ मध्ये मानवहित लोकशाही पक्षाची स्थापना त्यांनी केली. २०१९ ला राष्ट्रवादीला पाठिंबा देत राज्यभर प्रचार केला. २०१९ नंतर पूर्णवेळ सामाजिक चळवळीत सक्रिय होते. आता ठाकरे गटात प्रवेश करत सचिन साठेंकडून विधानसभेची तयारी सुरु आहे.

२०१९ मध्ये राष्ट्रवादीसाठी प्रचार करूनही सचिन साठेंच्या वाट्याला उपेक्षा आली. त्यानंतर स्वतंत्र वाटचाल करणाऱ्या सचिन साठेंनी आता ठाकरेंचं पारडं जड केलं आहे. सचिन साठेंनी साथ दिल्याने उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राभर फायदा होईल.
वेळ पडल्यास आपण देशाची राज्यघटनाच बदलू… जानकरांच्या वक्तव्यावर आंबेडकरी संघटनांकडून निषेध
दलित समाजातील पोटजातींसोबत मातंग समाजात सचिन साठेंना मान्यता असून अण्ण्णा भाऊ साठेंचे नातू असल्याने मातंग समाजात सचिन साठेंना आदराचं स्थान आहे. राज्यातील मातंग समाजावर सचिन साठेंची घट्ट पकड, तर समाजाला राज्यव्यापी नेतृत्वाची गरज आहे. लोकसंख्येच्या तुलनेत राजकीय प्रतिनिधित्व मिळालं नसल्याचा मातंग समाजाचा आरोप आहे. एससीसाठी राखीव असलेल्या सोलापूर, लातूर, अमरावती, रामटेक, शिर्डी या पाच लोकसभा मतदारसंघात मातंग समाज निर्णायक असून २९ राखीव विधानसभा मतदारसंघातही मातंग मतदारांचा टक्का मोठा आहे. अनेक खुल्या लोकसभा, विधानसभा मतदारसंघातही मातंग समाजाची ताकद आहे. मातंग समाजाच्या व्होट बँकेची ताकद दाखवण्याचा सचिन साठेंचा प्रयत्न आहे.

अण्णा भाऊ साठेंनंतर मातंग समाजाला दिशा देईल असं समाजिक किंवा राजकीय नेतृत्व आजवर उभं राहिलेलं नाही. त्यामुळे राजकारणात अपेक्षित संधी मिळाली नसल्याची भावना मातंग समाजात आहे. याच मुद्द्यावरून सचिन साठे सामाजिक लढाईत उतरलेत आणि मातंग बांधवांचा त्यांना भरभरून पाठिंबा मिळतो आहे. ठाकरेंनी जुळवून आणलेलं हे सोशल इंजिनीअरिंग खरंच फायद्याचं ठरु शकतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed