• Sun. Nov 24th, 2024

    विदर्भातील चार मतदारसंघ ‘वंचित’विना; यवतमाळ-वाशिममध्ये अर्ज बाद, आता पाठिंबा कोणाला?

    विदर्भातील चार मतदारसंघ ‘वंचित’विना; यवतमाळ-वाशिममध्ये अर्ज बाद, आता पाठिंबा कोणाला?

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : विदर्भातील दहापैकी चार लोकसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार लढत देणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. वंचित बहुजन आघाडीने नागपुरात काँग्रेसला; तर अमरावतीत रिपब्लिकन सेनेला पाठिंबा देऊन अर्ज दाखल केलेला नाही. यवतमाळ-वाशीममध्ये ‘वंचित’च्या उमेदवाराचा अर्ज त्रुटींमुळे बाद ठरला. रामटेकमध्ये उमेदवार दिला असून, ‘ईव्हीएम’वर वंचितचे चिन्हही राहणार आहे. अशातही त्यांनी काँग्रेसच्या बंडखोराला पाठिंबा जाहीर केल्याने लढत संपुष्टात आली आहे.

    वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत समाविष्ट होणार असल्याची आशा सुरुवातीपासून व्यक्त झाली. मात्र, शेवटच्या टप्प्यात जागांवरून एकमत न झाल्याने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. उमेदवारांची यादी जाहीर करताना नागपुरात ‘वंचित’ आघाडी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करणार असल्याचे जाहीर केले. या बदल्यात अकोल्याची जागा अॅड. आंबेडकर यांच्यासाठी काँग्रेस सोडणार, असा अंदाज बांधला जात होता. काँग्रेसने अकोल्यातून डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी देऊन ‘वंचित’च्या आशेवर पाणी फेरले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी ‘वंचित’साठी अजूनही मार्ग खुले असल्याचे सांगत साद घातली.

    रामटेकमध्ये काँग्रेस नेते सुनील केदार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ‘वंचित’च्या मनधरणीचा प्रयत्न केला. शेवटी वंचितचा उमेदवार कायम ठेवण्यात आला. आता ‘वंचित’चे शंकर चहांदे यांनी काँग्रेसचे बंडखोर किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे ईव्हीएमवर वंचितचे चिन्ह आणि उमेदवार राहणार असतानाही गजभिये यांना पाठिंबा देऊन या मतदारसंघातील चुरस संपविण्याचा प्रयत्न वंचितने केला आहे.
    प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणाकडे तुम्ही कसे बघता? रामदास आठवलेंची जोरदार फटकेबाजी
    अमरावती मतदारसंघात वंचितने उमेदवार जाहीर केला; अर्ज मात्र दाखल केला नाही. रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र आनंदराज यांनी ‘वंचित’चा पाठिंबा घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे वंचितची या मतदारसंघात अडचण झाली आहे. शेवटी आता या मतदारसंघात काँग्रेसला पाठिंबा देण्याशिवाय ‘वंचित’समोर पर्याय उरलेला नाही, अशीही चर्चा आहे.

    मतदारसंघनिहाय उमेदवार
    अकोला : अॅड. प्रकाश आंबेडकर
    बुलढाणा : वसंतराव मगर
    वर्धा : डॉ. राजेंद्र साळुंखे
    भंडारा-गोंदिया : संजय केवट
    चंद्रपूर : राजेश बेले
    गडचिरोली-चिमूर : हितेश मडावी
    नागपूर : उमेदवार नाही
    रामटेक : किशोर गजभियेंना पाठिंबा
    अमरावती : उमेदवार नाही
    यवतमाळ-वाशीम : छाननीत अर्ज बाद

    भाजपला पराभूत करायचे हेच पक्षाचे ध्येय आहे. मतविभाजनाचा भाजपला लाभ होऊ नये म्हणून नागपूर आणि कोल्हापूरमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला. आम्ही सात जागांवर पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले होते. उर्वरित पाच जगांसाठी यादीही मागितली. अजून काँग्रेसकडून ही यादी मिळालेली नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व जागांवर पाठिंबा मागितला आहे. पटोले हे भाजपपूरक भूमिका घेत आहेत.-राजेंद्र पातोडे, प्रदेश प्रवक्ते, वंचित बहुजन आघाडी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed