मतदार संघात जे प्रश्न असतील ते सोडवण्याचे आश्वासन विरोधकांकडून तुम्हाला मिळत आहेत. मतदार येत नाहीत गाडीत बसत नाहीत म्हणून हेलिकॉप्टरने आणण्याची तयारी विरोधकांकडून सुरू आहे. मात्र आमची लोक चालत येतील, सायकलवर येतील, बैलगाडीतून येतील. आमची परिस्थिती हेलिकॉप्टरने आणण्याइतकी मोठी नाही. मात्र समोरच्या बाजूने हेलिकॉप्टरने मतदार आणण्याची तयारी झाली असेल तर त्यांनी किती गोळा केला असेल याचा सर्वांनी विचार करावा, असं जयंत पाटील म्हणाले.
सदाशिवराव मंडलिक हे पुरोगामी होते, त्यांना आज काय वाटत असेल?
ईडीकडे करेक्ट केस आहे. ज्या शरद पवारांनी आयुष्यभर तुमच्यावर प्रेम केले, ज्यांनी या जिल्ह्यांमध्ये सदाशिवराव मंडलिकांपेक्षा तुम्हाला पुढे येण्यासाठी सतत प्रोत्साहन दिले त्यांनीच पवार साहेबांची साथ सोडली असे म्हणत अप्रत्यक्षरीत्या हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच सदाशिवराव मंडलिक हे पुरोगामी विचार किती परखडपणे मांडायचे. आज त्यांचा मुलगा पुरोगामी विचारांच्या विरोधात जाऊन बसला आहे हे स्वर्गीय सदाशिवराव मंडलिकाना ही मान्य नसावे, असेही पाटील यावेळी म्हणाले आहे.
सिरीयल पूर्ण व्हायच्या आधी दहा वेळा मोदींचा डिस्टर्बन्स
सोबतच जयंत पाटील यांनी केंद्र सरकारकडून करण्यात येत असलेल्या जाहिरातीवरही जोरदार टीका केली असून, आचारसंहिता लागण्यापूर्वी घरातल्या आया बहिणी सिरीयल बघायला टीव्ही सुरू करायच्या आणि मिनिटा मिनिटाला त्यावर जाहिराती येत असत. सिरीयलची स्टोरी पूर्ण व्हायच्या आधी दहा वेळा मोदी साहेब मध्येमध्ये यायचे. तीस मिनिटांच्या सिरीयलमध्ये पंधरा मिनिटं जाहिरात आणि पंधरा मिनिटांची सिरीयल हे पाहून लोक वैतागले होते. मात्र आता आचारसंहिता लागली आहे. त्यांच्या घोषणा म्हणजे मी पण खाणार नाही आणि तुम्हाला पण खाऊ देणार नाही अशा होत्या. यात आमची काही तक्रार नाही मात्र त्यांनी प्रत्यक्षात काय केलं? देशातील अनेक कंपन्यांवर धाडी टाकत इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून देणग्या घेतल्या असा आरोप जयंत पाटील यांनी केला. तसेच विरोधी उमेदवाराबद्दल बोलण्यासारखं काहीच नाही.