या सभेला शाहू महाराज छत्रपती, संभाजीराजे छत्रपती यांच्यासह इंडिया आघाडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरेगट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, यासह सर्व घटक पक्षातील नेते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संभाजी राजे छत्रपती यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
कोल्हापूर लोकसभेची ही निवडणूक पक्षाच्या पलीकडे गेलेली निवडणूक असून सगळ्यांच्या तोंडात आता बदल हवा आहे, हीच चर्चा आहे. महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी ठरवलं की शाहू महाराजांना निवडणूकीत उभं करायचं, पण शाहू महाराज तयार नव्हते. मात्र दिल्लीतील वातावरण गढूळ झालं आहे. लोकशाही बद्दल शंका निर्माण होत आहे. संविधान धोक्यात आलेलं आहे. अशावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा समतेचा आणि पुरोगामी विचार हा दिल्लीत गेल्याशिवाय जी घाण निर्माण झाले ही दुरुस्त होणार नाही. म्हणून लोकांच्या आग्रहास्तव शाहू महाराजांनी मोठ्या मनाने निवडणूक लढण्याचं स्वीकार केलं, असं संभाजीराजे यावेळी म्हणाले आहेत.
तसेच केंद्रात काय चालू आहे हे बोलण्यापेक्षा त्याआधी राज्यात काय चालू आहे हे बोलणं महत्त्वाचं आहे. नेते मंडळी कोण पाहिजे तिथे उड्या मारत आहे. कोल्हापुरातील अनेक नेतेमंडळी जी आयुष्यभर शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन चालणारी आज स्वतःच्या सोयीसाठी आपले मूळ विचार आणि स्वाभिमान बाजूला ठेवून राजकीय पोळी भाजण्यासाठी इकडे तिकडे उड्या मारायचा प्रयत्न करत आहेत, असे म्हणत विरोधकांवर टीका केली आहे.
तर लोकसभेचा रणांगण सुरू झालेला आहे. पुढच्या सात तारखेला आपल्याला विजयाचा जल्लोष साजरा करायचा आहे. ही तारीख म्हणजे महाराष्ट्राला दिशा देण्याचा निर्णय घेण्याची वेळ आहे. आज या देशातील परिस्थिती विचित्र होत चाललेली आहे. काँग्रेसने या देशाला एका उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न सातत्याने केला. मात्र गेल्या दहा वर्षांमध्ये देशाची प्रगती झाली की काही लोकांची प्रगती झाली हे देशातील जनतेला कळून चुकला आहे. एका बाजूला महागाईचा मारा आणि बेरोजगारी वाढत चालली आहे तर जीएसटीच्या माध्यमातून कंबरडं मोडण्याचे काम भाजप सरकार करत आहे. भाजप २०० किंवा २१४ च्या पुढे जाणार नाही अशी आकडेवारी समोर आली आहे. यामुळे विजय आपला निश्चित आहे. मात्र गाफील राहून चालणार नाही. ही निवडणूक जनतेची निवडणूक आहे ही निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी आहे, असं वक्तव्य सतेज पाटलांनी केलं आहे.
ते पुढे म्हणाले की, जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. जनतेने महागाई भ्रष्टाचार आणि इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून पैसा गोळा करण्याचा षडयंत्र या देशाने पाहिलं आहे. या सर्वाला येणारी सात तारीख हे उत्तर असणार आहे. येत्या काळात आणखी सभा होणार आहेत. अनेक विषय पुढे येतील. ज्या ज्या वेळी जसे जसे बॉल टाकले जातील, तशी आपण बॅटिंग करत राहूया. सुरुवात आपल्याकडं करायला नको बॉल तिकडून येऊ द्या. बॅटिंग आपण सुरू ठेवूयात महिनाभर बॅटिंग करायची आहे. फील्डिंग तुम्ही टाईट ठेवा, कुठेही अडचण या निवडणुकीत येणार नाही. शाहू महाराजांचा उमेदवारीचा फॉर्म १६ तारखेला आपण भरणार आहोत. शाहू महाराज खासदार झाले की त्यांच्यासाठी आम्ही स्वतंत्र नियोजन तयार केलं आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात खासदारांचा ऑफिस असणार आहे. सध्या एखाद्या माणसाला पत्र द्यायचा असेल किंवा खासदारांच्या पत्राची गरज असेल तर आताचे खासदार भेटत नाहीत तीन तीन दिवस पत्रावर सही होत नाही. मात्र महाराज खासदार झाल्यावर ही परिस्थिती राहणार नाही, असे आश्वासन सतेज पाटील यांनी दिले आहे.
या देशामध्ये लहान लहान पक्ष टिकले नाही पाहिजेत, म्हणून या राज्यातील दोन पक्ष फोडण्याचे पाप या राज्यातील महायुतीच्या सरकारने केले आहे. १०५ आमदार असलेल्या लोकांना शांत बसायची वेळ आली असून जे फुटून गेले आहेत ते मंत्रिमंडळात जाऊन बसले आहेत. प्रत्येकावर वेगवेगळे आरोप आहेत तरी देखील मांडीला मांडी लावून बसायला त्यांना लाज वाटत नाही. ही भाजपचे आजचे निती आहे. असे आमदार जयंत पाटील म्हणाले आहेत.
तसेच आज जागा वाटप करताना त्यांना किती पंचायत होत आहे हे दिसत आहे. मुख्यमंत्र्याच्या मुलाला उमेदवारी मिळत नव्हती. मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे उमेदवाराची घोषणा मुख्यमंत्री करायला हवेत मात्र ते देवेंद्र फडणवीस करत आहेत. म्हणजे सध्याच्या सरकारमधील तिन्ही पक्ष देवेंद्र फडणवीस चालवत आहेत असा टोला आहे. त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला आहे. तर या निवडणुकीत समोरून सगळे उपायोजना होणार आहेत. काही जणांना हेलिकॉप्टरमध्ये बसायची घाई निर्माण झाली आहे. मात्र तुमच्यावर प्रेम असेल तर मतदार चालत येईल, स्कूटरवर येईल, चारचाकीमधून येईल. मात्र जर विरोधकांची हेलिकॉप्टरची मानसिकता असेल तर विरोधकांकडून किती पैसा खर्च होणार आहे. याचा आपण सर्वांनी विचार करावा, असेही आमदार जयंत पाटील यावेळी म्हणाले आहे.