अंतर्गत राजकारणापेक्षा निवडणूक महत्वाची
राज्याचे नेते फडणवीस व त्यांचे खंदे समर्थक गिरीश महाजन यांचा विरोध डावलून भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने खडसेंच्या प्रवेशाल हिरवा कंदील दाखविला हे विशेष! भाजपाने लोकसभेसाठी ‘चारसौ पार’ चा नारा दिला आहे. त्यामुळे एक एक जागा महत्वाची आहे. त्यामुळे अंतर्गत राजकारणापेक्षा आज निवडणुकीतील विजय भाजपासाठी महत्वाचा असल्याने खडसेंचे केंद्रीय नेतृत्वाने स्वागत केले.
‘मराठा’ मतांचे नुकसान ‘ओबीसी’तून भरणार
महाराष्ट्रात भाजपाला फारसे अनुकल वातावरण नसल्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाजातील मते दूर जाण्याची भीती आहे. हे नुकसान भरुन काढण्यासाठी आता भाजपाकडून ‘ओबीसी कार्ड’ खेळले जात आहे. पंकजा मुंडे यांना उमेदवारी, नाशकातून छगन भुजबळांना उमेदवारी देण्यासाठीचा आटापिटा तसेच मागील काही दिवसांत भाजपामधील चंद्रशेखर बावनकुळे यांचे वाढलेले महत्व पाठोपाठ भाजप नेत्यांवर टोकाची टीका करणाऱ्या एकनाथ खडसेंसांठी घातलेल्या पायघड्या यावरुन भाजपाकडून ओबीसी नेत्यांना गोंजारण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
लोकसभेसह विधानसभेसाठीही खडसेंचा फायदा
जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघात खडसेंच्याच स्नुषा यांना उमेदवारी दिल्याने खडसे तेथे ताकद लावतीलच. मात्र, जळगाव मतदारसंघात भाजपाचे माजी खासदार उन्मेश पाटील ठाकरे गटात गेल्याने झालेले नुकसान भरण्यासाठी देखील खडसेंची मदत होईल. तेथील लेवा समाजावर असलेला खडसेंचा प्रभाव त्यासाठी कामात येईल. तसेच खडसेंना सोबत घेतल्याने महाराष्ट्रातील ओबीसी समाजात देखील सकारात्मक संदेश गेल्याने विधानसभा निवडणुकीत देखील ओबीसी प्रभाव असलेल्या मतदारसंघात फायद्याचे गणित भाजपाकडून या निमित्ताने मांडले गेले आहे. जळगाव जिल्ह्याचा विचार केल्यास विधानसभा निवडणुकीतही खडसेंच्या प्रवेशामुळे मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव, रावेर या चार मतदारसंघातही पक्षाला बळ मिळेल.
स्थानिक पातळीवर गिरीश महाजनांना वेसण
एकनाथ खडसे भाजपाचे जिल्ह्यातील नेते गिरीश महाजन यांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यांच्या विरोधानंतर देखील खडसेंचा भाजपात होत असलेला प्रवेश म्हणजे म्हणजे गिरीश महाजन यांनाही केंद्रीय नेतृत्वाकडून वेसण घालण्याचा प्रयत्न मानला जात आहे. अंतर्गत राजकारणामुळे पक्षाचे नुकसान सहन केले जाणार नाही, असा संदेशच महाजन यांना देण्यात आला आहे.