बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड विधानसभा क्षेत्रात सध्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार गावोगावी फिरत आहेत. खासदार सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्याही दौरे करत आहेत. दौंडची राजकीय स्थिती पाहिली तर तेथील विद्यमान आमदार राहुल कुल हे भाजपचे आहेत. माजी आमदार रमेश थोरात हे कट्टर अजित पवार समर्थक आहेत. पुणे जिल्हा दक्षिण भाजपचे अध्यक्ष वासुदेव काळे हे दौंडचेच आहेत. महानंदच्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे या अजित पवार समर्थक आहेत. त्यामुळे महायुतीकडे दौंडमध्ये भक्कम नेतेमंडळी आहेत. याउलट सुळे यांच्या प्रचाराची जबाबदारी व निवडणूक कार्यक्रम हाताळण्यासाठी तेथे शरद पवार गटाकडे मोठा नेता नाही. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.
कटारिया हे कुल समर्थक आहेत. त्यांच्याशी थेट शरद पवार यांनी बंद दाराआड चर्चा करणे ही तालुक्याच्या राजकारणातील उलथापालथीची नांदी म्हटली जात आहे. इंदापूरमध्ये माने परिवाराला आपल्याकडे खेचण्यात अजित पवार गटाला यश आले आहे.
आता दौंडमध्ये शरद पवार काय खेळी करतात, याकडे लक्ष लागले आहे. कटारिया हे दौंड पालिकेचे माजी नगराध्यक्ष असून दौंडमधील शिक्षण संस्थांसह अन्य संस्थांवर त्यांचे वर्चस्व आहे. कुल समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्याशी चर्चा करून शरद पवार दौंडमध्ये अजित पवार गटाला किंवा कुल गटाला धक्का देतात का हे येणाऱ्या काळात कळेल.