महायुतीतून उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अद्याप कोणालाही उमेदवारी जाहीर झालेली नाही. महाविकास आघाडीतून ठाकरे गटातर्फे अमोल कीर्तिकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांचे पिता आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी बापलेकातील संघर्ष टाळण्यासाठी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कीर्तिकरांच्या जागी उमेदवाराची चाचपणी सुरु आहे.
संजय निरुपम यांच्यासोबतच प्रख्यात मराठी कलाकार आणि कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे नेते शरद पोंक्षे, ‘महागुरु’ नावाने ओळखले जाणारे ज्येष्ठ गायक, संगीतकार, अभिनेते सचिन पिळगावकर आणि हरहुन्नरी कलाकार सचिन खेडेकर या लोकप्रिय चेहऱ्यांचाही विचार या जागेसाठी केला जात आहे.
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत संजय निरुपम उत्तर पश्चिम मुंबईतून विजयी झाले होते. २०१४ आणि २०१९ मध्ये संजय निरुपम यांनी उत्तर मुंबईतून निवडणूक लढवली. दोन्ही वेळा भाजपच्या गोपाळ शेट्टींकडून दोन वेळा पराभव झाला.
संजय निरुपम यांना उत्तर-पश्चिम मुंबईतून उमेदवारी मिळाली, तर उत्तर-भारतीयांची मतं मिळवण्यात महायुतीला यश येऊ शकते, मात्र संजय निरुपम यांच्या नावाला भाजपकडून विरोध होत असल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे, लोकप्रिय मराठी कलाकारांना उमेदवारी दिली तरी शिवसेनेला मराठी मतदारांकडून फायदा होण्याची शक्यता आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
उत्तर- पश्चिम मुंबईत जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पूर्व आणि पश्चिम या मतदारसंघाचा समावेश आहे. येथे ठाकरे गटाचे २ आमदार, भाजपचे तीन, तर शिवसेनेचा (शिंदे गट) एक आमदार आहे. आता शिवसेनेच्या फुटीनंतर या जागेवर कोण वर्चस्व राखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेत आता ठाकरे गटाविरुद्ध कोणता तगडा उमेदवार महायुतीतून उभा केला जाणार हे बघणे महत्त्वाचे ठरेल.