जळगाव दि.4 ( जिमाका ) रावेर लोकसभा मतदार संघांमध्ये सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने तालुक्यातील मतदानाची टक्केवारी वाढवी यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली सहा निवडणूक अधिकारी देवयानी यादव यांच्या नेतृत्वाखाली सर्व मतदान जनजागृती करिता सायकल व मोटरसायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे नियोजन तहसीलदार बंडु कापसे यांनी केलें होते.
ही रॅली डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, सावदा रोड, अकोले विद्यालय, चौराहा, चावडी, थडा भाग, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भोई वाडा, गांधी चौक, आठवडे बाजार मार्गे कमलाबाई गर्ल्स हायस्कुल येथे रॅली आणण्यात येऊन या ठिकाणी समारोप करण्यात आला.
शहरातील मतदान केंद्र क्रमांक 90 ते 95 या केंद्रांवर सर्वात कमी मतदान टक्केवारी असल्याने तेथील केंद्रातील मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती व्हावी तसेच रावेर शहरातील मतदार यांना मतदान करणे आपला हक्क आहे ही जाणीव करून देण्यासाठी सदरची रॅली काढण्याचा उद्देश होता. सहा जिल्हा निवडणूक अधिकारी देवयानी यादव (IAS) यांच्यासह तहसीलदार बंडु कापसे, यावल तहसीलदार श्रीमती मोहनमाल नाझिरकर, अप्पर तहसीलदार मयूर कळसे, गट विकास अधिकारी श्रीमती दिपाली कोतवाल, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब वाळके, गट शिक्षणाधकारी श्री दखने, सहा. गट विकास अधिकारी राजेंद्र फेगडे, , नायब तहसीलदार आर डी पाटील , किशोर पवार, यांच्यासह वन अधिकारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी, सर्व ग्रामसेवक,तलाठी, मंडळ अधिकारी तसेच तालुक्यातील सर्व कर्मचारी अधिकारी यांची उपस्थिती होती.
या रॅलीत मतदारांनी आपल्या हक्काची जाणीव ठेवावी व सार्वत्रिक निवडणूक हा एक उत्सव आहे आणि या उत्सवात आपण सहभागी होऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करण्यात आले. या भागातील बी.एल.ओ . यांनी मतदारांना मतदानाबाबत जागृत करावे व सदर मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदान होईल याकडे लक्ष द्यावे. जे नवीन मतदार आहेत. नव्याने १८ वर्ष पूर्ण करून प्रथमच मतदान करणार आहे त्यांनी आपला हक्क बजावावा. रावेर मतदार संघामध्ये सुमारे साडेचार हजार अठरा वर्षांवरील नवीन मतदार यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. संबंधित मतदार यांनी जागृत राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावावा व राष्ट्रीय उत्सवांमध्ये सहभाग नोंदवावा असे ही आवाहन श्रीमती यादव यांनी केले. प्रास्ताविकासह आभार तहसीलदार बंडुजी कापसे यांनी मानले.
रॅली प्रसंगी संचलन दीपक नगरे यांनी केले. रॅलीत महसूल, पंचायत समिती, कृषी विभाग, नगरपालिका, वन विभाग नाईक महाविद्यालय, पोलीस विभाग यांच्यासह सेवाभावी संस्था यांचा सहभाग होता.