• Sat. Sep 21st, 2024

नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईचे भीषण वास्तव! हंंडाभर पाण्यासाठी महिलांची रोज ३ किमी पायपीट

नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईचे भीषण वास्तव! हंंडाभर पाण्यासाठी महिलांची रोज ३ किमी पायपीट

म.टा.प्रतिनिधी, नाशिक: शहरासह उपनगर व जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसागणिक तीव्र होत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रहिवाशांकडून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी होते आहे. जिल्ह्यात सध्या २१० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत २०३ गावे आणि ४३६ वाड्या अशा ६३९ ठिकाणी २१० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सर्वाधिक ४९ टैंकर नांदगाव तालुक्यात, तर ४५ टैंकर येवला तालुक्यात तहान भागविण्याचे काम करीत आहेत.

डोईवरील उतरंड सांगा उतरेल कधी?
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील मुळेगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याचे दुर्भीक्ष्य असल्याने महिलांना दोन ते तीन किमी अंतरावर जाऊन डोक्यावर हंड्याने पाणी आणावे लागत आहे. सहा वाड्यांची वस्ती असलेल्या मुळेगाव येथे आदिवासी समाज आहे. सध्या दाट लग्नतिथी, गावजत्रा, शिमगा आदी निमित्ताने गावात गर्दी वाढत आहे. अगोदरच पाणीटंचाई असल्याने पाहुणेरावळे आल्याने महिलांची पाण्यासाठी धावपळ होत आहे. याबाबत ग्रामपंचायत, पंचायत समिती अथवा जिल्हा परिषद दखल घेतली जात नाही. या कालावधीत शासनाने टँकर उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

मुळेगावात ४१५ कुटुंबे वास्तव्यास असून, साडेतीन हजाराहून जास्त लोकवस्ती आहे. २६ जून १९९९ रोजी त्र्यंबक तालुकानिर्मिती झाली, त्याआधीपासून ते आजपर्यंत विविध नावांनी पाणीपुरवठा योजना आल्या. मात्र, एकही योजना पाणी पाजण्यास यशस्वी ठरली नाही. ग्रामीण पाणीपुरवठा, भारत निर्माण, जलस्वराज्य यासाठी वेळोवेळी लाखो रुपये खर्च झाले आहेत. तीन विहिरी खोदण्यात आल्या. मात्र, पाण्याचा उद्भव नसल्याने केवळ जलकुंभ, पंप हाऊस बांधून पैशांची उधळपट्टी करण्यात आली. त्यानंतर मागच्या तीन वर्षांपासून जलजीवन मिशन नावाने ४५.२२ लाख रुपयांची योजना राबविण्यात येत आहे. मध्यंतरी येथील योजना न्यायप्रविष्ट बाब म्हणून नोंद झाली. आता पाण्याचा उद्भव नाही म्हणून अंजनेरी धरणाचे पाणी पाइपलाइनद्वारे आणण्याचे ठरले आहे. मात्र, धरणावर पंप हाऊससाठी जागा मिळत नाही, या कारणास्तव जून २०२४ अखेरचे उद्दिष्ट असलेली योजना रखडली आहे. मुळेगावला पिण्याचे पाणी मिळणे दुरापस्त झाले आहे. याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता आणि ग्रामसेवक दोन्ही काही दिवसांपासून नागरिकांचे कॉल स्वीकारत नसल्याने, याबाबत काय उपाययोजना सुरू आहेत, हे समजू शकले नाही.
—————–
म्हसरुळला टॅंकरने पुरवठा
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी :
म्हसरूळ परिसरात पाणीपुरवठ्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून तक्रारी वाढत आहेत. या परिसरात नव्याने जलकुंभ बसविण्यात आल्यानंतरही पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने येथील रहिवाशांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येत आहे. पाणीपुरवठ्याबाबत तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून वेगवेगळी कारणे देऊन तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे.

म्हसरूळ परिसरातील गणेशनगर, समृद्धी कॉलनी, सावरकर नगर, अनुराधा कॉलनी या भागात प्रामुख्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. उन्हाची तीव्रता वाढली असल्याने पाण्याची गरज वाढली आहे. अशा परिस्थितीत पाणी गरजेपेक्षा कमी मिळत असल्याने येथील रहिवाशांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येत आहे. टँकरची मागणी वाढली असल्याने तेही वेळेवर मिळत नाहीत. म्हसरूळ परिसरात लोकवस्ती वाढली आहे. त्याचा विचार करून येथील जलवाहिनींची क्षमता वाढविणे गरजेचे झालेले आहे. कमी व्यासांच्या जलवाहिन्यामुळे पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना बुधवारी भाजपचे शहर सचिव अमित घुगे यांनी निवेदन देऊन या परिसरातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव, सरचिटणीस काशिनाथ शिलेदार, गणेश कांबळे, ऋषिकेश डापसे, मिहिर हजारे उपस्थित होते.

महापालिकेकडून ही कारणे पुढे
– नवीन जलकुंभाचे काम सुरू आहे
– जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे
– जलवाहिन्या तपासणीचे काम करण्यात येत आहे
‘जायकवाडी’त पाणी आरक्षण; मराठवाड्यातील तीव्र टंचाईमुळे जलसंपदा विभागाने घेतला निर्णय
———————————-
पवननगरला कमी दाबाने पाणी
म. टा. वृत्तसेवा, सिडको : पवननगर भागात गेल्या महिनाभरापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना दैनंदिन वापरासाठी लागणारे पाणीदेखील मिळत नाही. पहिल्या मजल्यावर असणाऱ्या घरांनाही पाणी मिळत नसल्याने पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारावर महिला वर्ग संताप व्यक्त करीत आहेत.

सिडकोतील पवननगर भागातील हनुमान चौक, गिरीजाई अभ्यासिका, महादेव मंदिर परिसर तसेच मुख्य रस्त्यावर असलेल्या सिडकोच्या अनेक सोसायट्यांमध्ये गेल्या १५ ते २० दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना दैनंदिन वापरात लागणारे पाणीदेखील मिळणे मुश्किल झाले आहे. अजूनही एक ते दोन दिवस पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नागरिकांना टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ येणार आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे काही भागात पाणी येते, तर काही भागात पाणी नाही. काही ठिकाणी तर अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. गेल्या महिनाभरापासून विविध ठिकाणी हीच परिस्थिती असल्याने पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पाणीपुरवठा अधिकारी गोकुळ पगारे यांच्यावर अतिरिक्त दोन कामांचा कारभार सोपविल्याने सिडकोतील पाणीपुरवठ्यावर दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत परिसरातील महिला वर्गाने सिडको विभागीय कार्यालयात जाऊन तक्रार केली. लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

गेल्या १५ ते २० दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा विभागात अनेकदा तक्रारी केल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तळमजल्यापर्यंत पाणी पोहोचेल या दाबाने पाणी सोडा असा आदेश पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिला आहे.- प्रदीप महाजन, स्थानिक रहिवाशी
राज्यातील जलसाठा ३८ टक्क्यांवर, कोणत्या जिल्ह्यातील धरणात किती पाणी? पाहा आकडेवारी
——————–
ज्ञानेश्वरनगरला वणवण
म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर : येथील ज्ञानेश्वरनगर भागात गेल्या आठ दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, तर काही घरांमध्ये पाणीच येत नसल्याने नागरिकांना बादलीभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. अखेर संतप्त महिलांनी बुधवारी रस्त्यावर उतरून पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त केला. सहा महिन्यांपासून कमी दाबाने पाणी येत असून, गेल्या आठ दिवसांपासून पिण्यासाठीही पाणी मिळत नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या. याबाबत लवकरच मनपा आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.

ज्ञानेश्वरनगर परिसरात मागील सहा महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. वापरण्यासही पाणी नसल्याने टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. संपूर्ण परिसरात पाच ते सहा जलकुंभ, तसेच मुकणे धरण असले तरीही पाणीपुरवठा विभागाच्या शून्य नियोजनामुळे ऐन उन्हाळ्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी जेमतेमच मिळत असून, दैनंदिन वापरासाठी लागणारे पाणी आणायचे कुठून? असा प्रश्न परिसरातील दीपाली देशमुख, राम सहाणे, मनोज देसले, निरंजन पवार, उमेश पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. राणेनगर, चेतनानगर, वासननगर, प्रशांतनगर, पाथर्डी फाटा यांसह विविध भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना गेल्या महिन्याभरापासून पाण्याची समस्या ही नित्याचीच बनलेली आहे.

सदर परिसरात दिवसेंदिवस नवनवीन गृह प्रकल्प, इमारती बांधल्या जात आहेत. नागरिकांची वाढती लोकसंख्या लक्षात घेत पाण्याचे नियोजन केले जात आहे. पाणीच मिळत नाही असे नाही, तर कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.- गोकुळ पगारे, पाणीपुरवठा अधिकारी, सिडको

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed