• Mon. Nov 25th, 2024
    कळसूबाईच्या शिखरावर महिलांना प्रवेशबंदी? वादानंतर हटवला फलक, बोर्ड कोणी लावला?

    म. टा. प्रतिनिधी, नगर : महाराष्ट्रातील सर्वांत उंच असलेल्या कळसूबाईच्या शिखराजवळ लावण्यात आलेला महिलांना विशिष्ट दिवसांत प्रवेशबंदी करणारा फलक लावण्यात आला होता. मात्र, त्यावरून वादंग माजताच मंगळवारी सायंकाळी तो फलक ग्रामस्थांनी काढून टाकला. मात्र, तो कोणी लावला होता हे समजू शकले नाही.घरात विटाळ असल्यास संबंधितांनी शिखर चढू नये, विवाहित महिलांनी शिखरावरील देवीच्या मंदिरात प्रवेश करू नये, अशा सूचना लिहिलेला एक फलक सुळक्याच्या पायथ्याला लावण्यात आला होता. येथे नियमित येणाऱ्या काही गिर्यारोहकांनी याबाबत समाजमाध्यमांत नाराजी व्यक्त केल्याने चर्चा सुरू झाली. याची दखल राज्य महिला आयोगानेही घेतली. आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
    मनसे कार्यकर्त्यांत संभ्रम, पक्षाकडून अधिकृत भूमिका जाहीर नाही; प्रचाराबाबतही गोंधळ

    हा फलक तेथे कोणी लावला, याचा उल्लेख नाही. मात्र, तो काही गावकऱ्यांनीच लावला असल्याचे सांगण्यात येते. या शिखरावर नेहमी येणारे अकोले तालुक्यातील गिर्यारोहक राहुल भांगरे यांनी ही गोष्ट सर्वांच्या निदर्शानास आणून दिली. दोन दिवसांपूर्वी ते येथे आले असता त्यांना हा फलक दिसला. हा फलक पाहून भांगरे अस्वस्थ झाले. त्यांनी ही बाब समाजमाध्यमांवर मांडली आणि ती चुकीची असल्याचेही प्रतिपादन केले. दरम्यान, या फलकावरून वाद निर्माण होताच मंगळवारी सायंकाळी हा फलक तेथून हटवण्यात आल्याचे सरपंचांनी प्रशासनाला कळवले.

    कळसूबाई ही स्त्रीशक्तीचे मोठे प्रतीक आहे. स्थानिक दंतकथेनुसार कळसूबाई अत्यंत स्वाभिमानी होती. घरचे मनाविरुद्ध वागल्यामुळे ती घर सोडून थेट या शिखरावर जाऊन बसली. आदिवासी समाज स्त्रियांना समानतेचा दर्जा देणारा आहे, असे अभिमानाने म्हटले जात असताना, एका आदिवासी स्त्रीच्या मंदिरात मात्र स्त्रियांनाच अशी बंदी घालणे पूर्ण चुकीचे नाही का?

    – राहुल भांगरे, गिर्यारोहक, अकोले

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed