• Sat. Sep 21st, 2024

निवडणूक कर्मचाऱ्यांच्या आपात्कालीन वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयांनी बेड्स आरक्षित ठेवावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

ByMH LIVE NEWS

Apr 2, 2024
निवडणूक कर्मचाऱ्यांच्या आपात्कालीन वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयांनी बेड्स आरक्षित ठेवावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, दि.२(जिमाका):- उन्हाळ्याचे दिवस पाहता निवडणूक कामकाजादरम्यान कर्मचाऱ्यांना अकस्मात वैद्यकीय समस्या उद्भवली तर अशा आपात्कालीन वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयांनी काही बेड्स आरक्षीत ठेवावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.

लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभुमिवर आज जिल्ह्यातील मल्टिस्पेशालिटी इस्पितळ चालकांची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, मनपा आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा तसेच शहरातील २० रुग्णालयांचे संचालक उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, निवडणूकीच्या कामकाजादरम्यान एखाद्या अधिकारी – कर्मचाऱ्याची अचानक तब्येत बिघडून काही वैद्यकीय समस्या निर्माण झाल्यास त्यावर तातडीने उपचर होणे आवश्यक आहे. अशा परिस्थिती त्या त्या ठिकाणाहून जवळच्या रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध व्हावी यादृष्टीने रुग्णालयांनी प्रशासनाला सहकार्य करावे. मतदान, मतमोजणी व प्रशिक्षणांदरम्यान अशी परिस्थिती उद्भवू शकते. त्यावेळी मतदान व मतमोजणी कालावधीच्या दरम्यान दोन दिवस आधी व नंतर रुग्णालयांत काही बेड्स आरक्षित ठेवावे.  तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी, आपात्कालिन कक्षातील संपर्क क्रमांक आदींची माहिती प्रशासनाला द्यावी,असे आवाहनही जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले.

मतदार जागृतीतही रुग्णालयांनी सहभाग घ्यावा

जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांच्या व्यवस्थापनांनी मतदार जनजागृती उपक्रमांमध्ये आपला सहयोग द्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या बैठकीदरम्यान केले. रुग्णालयांनी आपले बाह्यरुग्ण कक्ष, मोकळ्या जागा अशा ठिकाणी मतदानाचे महत्त्व सांगणारे घोषवाक्ये , प्रतिक्षालयांमध्ये व्हिडीओद्वारे मतदार जनजागृती करावी. किंवा यासाठी अभिनव कलपना रुग्णालये वापरु शकतात. जसे फाईलवर, रुग्णांना द्यावयाच्या सुचनापत्रकावर, अशा  ठिकाणी मतदानाचे महत्त्व सांगणारे घोषवाक्ये, मतदानाचे आवाहन छापून ते रुग्णांपर्यंत त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले.

०००००

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed