सत्तेसाठी लाचारी स्वीकारणे योग्य नाही
आज देशात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तरी काही जण म्हणतात आम्ही काम करण्यासाठी सत्तेत जात आहोत. सत्तेसाठी लाचारी स्वीकारणे योग्य नाही अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली तसेच कोणत्या विचारामागे राहून आपण काम करतोय हे पाहणे गरजेचे आहे. राजकारणात विचार आणि आचार फार महत्वाचे असतात. पवारसाहेब, उद्धव ठाकरे यांच्या मागे लोक मोठ्या ताकदीने उभे आहे. पवार साहेब, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी परिस्थिती बदलू शकतात यावर लोकांचा ठाम विश्वास आहे, असेही ते म्हणाले.
एकीकडे ‘न खाऊंगा न खाने दुंगा’ म्हणायचे आणि दुसरीकडे ‘जो भी है वो मैं ही खाऊंगा’
आज टीव्हीद्वारे जाहिराती प्रसारित केले जात आहे. सर्वत्र सत्ताधारीच दिसतील अशी व्यवस्था केली जात आहे. जाहिरातींवर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असेल तर विचार करा यांची मिळकत किती असेल? या सरकारने इलेक्टोरल बाँड्स नावाची व्यवस्था मध्यंतरी सुरू केली. विविध संस्थांच्या माध्यमातून यांनी पैसे घेतले त्याची माहिती गुप्त ठेवण्यात आली. लोक कोर्टात गेल्यावर सुप्रीम कोर्टाने सांगितले की सर्व व्यवहार जाहीर करा. हे जाहीर झाल्यावर कळले की निम्म्याहून अधिक पैसे हे भाजपला मिळाले आहे. ज्यांनी पैसे दिले त्यांच्यावर ईडी, आयटी या संस्थांद्वारे कारवाई सुरू होती. पैसे दिले तेव्हा सुटका झाली. हा उघड उघड भ्रष्टाचार आहे, भ्रष्टाचार कसा करावा याची नवी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रकार मागच्या पाच वर्षांत झाला. एकीकडे ‘न खाऊंगा न खाने दुंगा’ म्हणायचे आणि दुसरीकडे ‘जो भी है वो मैंही खाऊंगा’ असे केले जात आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
मागच्या १० वर्षात यांनी देश अधोगतीकडे नेला
टिव्हीवरील जाहिरातींच्या माध्यमातून काँग्रेसने ७० वर्षांत काय केले नाही हे सांगितले जात आहे. हे १० वर्षे सत्तेत आहेत, यांनी १० वर्षात काय केले याचीही एखादी जाहिरात करा. ७० वर्षांत काम केले म्हणून देश आज इथपर्यंत आला आहे. मागच्या १० वर्षात यांनी देश अधोगतीकडे नेला. आज देशातील तरुणांना रोजगार नाही. पीएच.डी झालेली मुले आज शिपायाच्या नोकरीसाठी अर्ज भरत आहेत. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये आपल्या देशाचा नंबर १११ वा लागतो. भाजप यावर उत्तर देईल का? का देश पुढे गेला नाही? यांचे उत्तर काय असेल तर तुम्ही साठ वर्षात काय केले? आम्ही फक्त १० वर्षांचा हिशोब मागतोय तर यांची ही परिस्थिती आहे. टिव्हीवर जे दाखवले जाते ते फक्त दिसायला चांगलं आहे, खरी परिस्थिती तुम्ही आम्ही भोगतोय असे ते म्हणाले.
अहमदनगर जिल्हा हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जिल्हा आहे. त्यांना दुर्दैवाने फार तरुण वयात आपल्या पती गमवावे लागले पण त्यांनी न डगमगता आपले राज्य सांभाळले. आपल्या राज्याचे रक्षण त्यांनी केले. हा आपला इतिहास आहे. निलेश लंके या विचारांचे पाईक आहे. दिल्लीच्या तख्तासमोर झुकायचे नाही हा पवार साहेब, उद्धव ठाकरे यांचा बाणा आहे, असेही ते म्हणाले.
आमच्यातले काही सरदार तिकडे गेले आहे पण दिल्ली दरबारी त्यांना काही मान नाही. दिल्ली त्यांना बाहेर तात्काळात ठेवते. काल आमचे साताऱ्याचे छत्रपती चार दिवस दिल्लीत होते पण त्यांना भेटीसाठी वेळ दिला गेला नाही. अरे दिल्ली दरबारात दुसर्या रांगेत उभे केले म्हणून शिवराय बादशाहाचा भरलेला दरबार सोडून निघून आले. शिवरायांनी आणि शंभूराजाने आपल्याला स्वाभिमानाचे बाळकडू पाजले आहे. हा स्वाभिमान आपण सर्वांनी जपला पाहिजे असे सांगत असतानाच निलेश लंके या लढाईच्या रिंगणात आहेत. दुसऱ्या बाजूने सर्व गोष्टींचा पाऊस पाडला जाईल पण लोकांनी लंके यांच्या बाजूनेच मतांचा पाऊस पाडावा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.