शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढळराव यांना शिरूर लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. आढळरावांना पक्षात घेण्यास अनेक स्थानिक आमदारांचा विरोध होता. वळसे पाटील आणि आढळराव हे आधी घनिष्ठ मित्र होते.
दरम्यान, आढळरावांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी ‘राष्ट्रवादी’तून शिवसेनेत प्रवेश केला आणि ते संसदेतही मार्गस्थ झाले. या काळात आढळराव विरुद्ध वळसे पाटील असा संघर्षही पाहायला मिळाला. वीस वर्षांनी आढळरावांची घरवापसी झाली आहे. आढळराव आणि वळसे पाटील यांचे मैत्र पुन्हा बहरत असताना वळसे पाटील यांना नेमका अपघात झाला. हात दुखावल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याने ते प्रचारापासून दूर आहेत.
खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी आढळरावांना पक्षात घेण्यास तीव्र विरोध केला होता. मात्र, काही दिवसांनी ‘वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आढळरावांचा प्रचार करू,’ अशी भूमिका मोहिते यांनी घेतली. आता वळसे पाटीलच प्रचारात सक्रिय नसल्याने मूळचे ‘राष्ट्रवादी’चे कार्यकर्तेही जरा लांबच असल्याने आढळरावांना स्वत:ची यंत्रणा राबवावी लागत आहे.
वळसे पाटील यांची शरद पवारांकडून विचारपूस
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना दूरध्वनी करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. पवार यांचे मानसपुत्र म्हणून वळसे पाटील यांची ओळख आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर वळसे पाटील यांनी अजित पवारांची साथ देत पवारांना धक्का दिला. त्यानंतर वेगवेगळ्या व्यासपीठावर पवार आणि वळसे पाटील अनेकदा एकत्र आले. आता आजारपणात विचारपूस करून पवार यांनी सुसंस्कृत राजकारणाचा धडा दिला. पवार यांच्या पत्नी प्रतिभा यांनीही वळसे पाटील यांच्याशी संवाद साधला.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
शिरूरसाठी महायुतीची आज बैठक
शिरूर लोकसभा मतदारसंघाची महायुतीची समन्वय बैठक आज, सोमवारी चाकण येथील हॉटेल आरती एक्झिक्युटिव्ह येथे दुपारी बारा वाजता होणार आहे. शिरूर, बारामती, पुणे लोकसभा मतदारसंघांचे महायुतीचे प्रमुख मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीस अनेक नेते हजेरी लावण्याची शक्यता आहे. वळसे पाटील आजारी असल्याने ते उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. वळसे पाटील यांच्यासह ‘राष्ट्रवादी’चे आमदार; तसेच शिवसेना आणि भाजपचे कोणकोणते पदाधिकारी उपस्थित राहणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.