• Sat. Sep 21st, 2024
पुण्याची धुरा ‘राज्यसेवे’वर; सरकारचा थेट ‘आयएएस’वरील विश्वास डळमळीत झाल्याची चर्चा

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे शहराचा प्रशासकीय कारभार पाहणारे महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त; तसेच जिल्हाधिकारी हे तिन्हीही अधिकारी ‘राज्यसेवे’तील असून, शहराच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच राज्यसेवेतील अधिकारी हाती कारभार सोपविण्यात आला आहे. आतापर्यंत या तिघांपैकी किमान दोन अधिकारी ‘भारतीय प्रशासकीय सेवे’ तील असायचे.

भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) दोन प्रकारे दाखल होता होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून (यूपीएससी) थेट नियुक्त होणारे अधिकारी; तसेच राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेतून नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना नोकरीच्या ठराविक कालावधीनंतर ‘आयएएस’च्या सेवेत दाखल करून घेण्यात येते. राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेतून नियुक्त झालेले आणि केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये बढती मिळालेले महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे हे तिन्ही प्रमुख अधिकारी सध्या पुण्याचा कारभार हाकत आहेत.

‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’च्या (पीएमआरडीए) आयुक्तपदीही राज्यसेवेतून भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झालेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास हा इतिहास घडणार असल्याची प्रतिक्रिया उच्चपदस्थ अधिकाऱ्याने व्यक्त केली. ‘राज्यसेवे’तील; त्यातही कृषी पदवीधर असलेल्या अधिकाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याने या अधिकाऱ्यांकडून या पदांवर नियुक्ती होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातात. ‘राज्यसेवे’तील अधिकारी ‘आयएएस’पदी नियुक्त झाल्यानंतर पुणे शहरातील प्रमुख पदांवर वर्णी लागावी, यासाठी प्रयत्नशील असतात. यंदा एकाचवेळी तिन्ही प्रमुखपदी ‘राज्यसेवे’तील अधिकाऱ्यांची लागलेली वर्णी चर्चेचा विषय ठरला आहे. थेट ‘आयएएस’ अधिकाऱ्यांवरील राज्य सरकारचा विश्वास कमी झाल्यानेच ‘राज्यसेवे’तील अधिकाऱ्यांना ही प्रमुखपदे मिळाली असल्याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. राज्य सरकारमध्ये थेट पद्धतीने दाखल होणाऱ्या ‘आयएएस’ अधिकाऱ्यांची संख्या साधारणत: ७० टक्के आहे. त्यामुळे प्रमुख पदांवर नियुक्ती मिळविण्यासाठी या अधिकाऱ्यांकडून पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करण्यात येतात.
पुणेकरांसाठी ‘इलेक्शन डे’ असणार ‘ड्राय डे’; जिल्ह्यात आचारसंहितेपर्यंत मद्यपरवाने बंद
चौथ्या नावाचीही चर्चा

‘पीएमआरडीए’चे विद्यमान आयुक्त राहुल महिवाल यांची आचारसंहितेनंतर बदली होण्याची चर्चा आहे. त्यांची जागी मिलिंद शंभरकर यांची नियुक्तीची कुजबूज आहे. शंभरकर यांना मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या मुख्य अधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे. मे महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये त्यांची नियुक्ती ‘पीएमआरडीए’च्या आयुक्तपदी होणार असल्याची चर्चा आहे. शंभरकर यांची ‘पीएमआरडीए’च्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यास पुण्याच्या प्रमुख चारही महत्त्वाच्या पदांवर राज्यसेवेतील अधिकाऱ्यांचा पगडा राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed