• Sat. Sep 21st, 2024

अमरावतीत नवनीत राणा; प्रयोगशाळेत शरद पवारांना ठेच अन् भाजप शहाणा; चौकट आखली, रणनीती ठरली

अमरावतीत नवनीत राणा; प्रयोगशाळेत शरद पवारांना ठेच अन् भाजप शहाणा; चौकट आखली, रणनीती ठरली

अमरावती: महाराष्ट्रात सातत्याने चर्चेत राहणाऱ्या अमरावती जिल्ह्याच्या राजकारणावर देशाचे लक्ष केंद्रित झाले आहे. भारतीय जनता पार्टीने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना याच मतदारसंघात २०१९ मध्ये लागलेली ठेच पाहता भारतीय जनता पार्टीने प्रचंड सावध पवित्रा घेत व्यूहरचना आखल्याचे चित्र राणा यांच्या भाजप प्रवेशामुळे स्पष्ट झाले आहे.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला हा मतदार संघ. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ विरुद्ध राष्ट्रवादी – काँग्रेस च्या उमेदवार नवनीत राणा यांच्या झालेल्या लढतीत शिवसेनेचे आनंदराव अडसूळ विजयी झाले. २०१४ ते २०१९ दरम्यान नवनीत राणा यांनी जिल्ह्याचा अभ्यास केला. जिल्ह्यातील प्रश्न समजून काही एनजीओंच्या माध्यमातून लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करत थेट त्यांच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न सुरू केला. सर्वसामान्य नागरिकांच्या वेदनांवर फुंकर घालण्याचं काम म्हणून नवनीत राणा यांनी तात्पुरत्या स्वरुपाच्या काही मदतीचा पुरवठा वाढवला. परिणाम स्वरूप नवनीत राणा या चर्चेत आल्या.
तुमचा येण्याजाण्याचा, हॉटेलचा खर्च करतो, तुम्ही फक्त…; ठाकरेंचं फडणवीसांना ओपन चॅलेंज
२०१९ मध्ये भारतीय जनता पार्टीची सुप्त लाट देशभरात होती. अमरावती लोकसभेतून शिवसेना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून आनंदराव अडसूळ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून नवनीत राणा रिंगणात होता. या निवडणुकीत नवनीत राणांना पाच वर्षांत केलेल्या अभ्यासाचा आणि कामांचा फायदा झाला आणि त्या मोदी लाटेत सुद्धा निवडून आल्या.

पराभूत झालेले उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी राणांच्या खोट्या जात प्रमाणपत्रा संदर्भात न्यायालयात केस दाखल केली. दरम्यान खासदार नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी व काँग्रेस विचारधारेसोबत फारकत घेत भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्वाच्या राजकारणासोबत जुळवून घेण्यास सुरुवात केली. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी अगदी सहजपणे बदललेली विचारधारेची भूमिका अनेकांच्या अद्यापही पचनी पडलेली नाही.
घड्याळ गेल्यामुळे वेळ जुळेना…; कोल्हेंकडून वधूवरांना हटके शुभेच्छा; उपस्थितांमध्ये हशा
खासदार नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाने त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली. मात्र २०१९ च्या निवडणुकीनंतर घडलेला सगळा घटनाक्रम डोळ्यासमोर ठेवून, शरद पवार यांना लागलेली ठेच लक्षात घेऊन भाजपने सावध सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.

२०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आल्यानंतर राणांनी बदललेली भूमिका लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला. शनिवारी अमरावती जिल्हा भाजप कार्यालयात झालेल्या मीटिंगमध्ये नवनीत राणा यांच्या बोलण्यातून भाजपने घालून दिलेली शिस्तीची चौकट स्पष्टपणे जाणवत असल्याचे मत राजकीय निरिक्षकांनी नोंदवले.

२०२४च्या निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी भारतीय जनता पार्टीने नवनीत राणा यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांच्या लवचिक राजकीय भूमिकेवर शिस्तीचा शिक्का मारत परतीची दारे बंद केल्याची चर्चा जिल्ह्यात जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed