• Mon. Nov 25th, 2024

    पीएमपीला पुणेकरांची पसंती, प्रवासी संख्या दीड कोटींनी वाढली, तिकीट विक्रीतून ६११ कोटींचे उत्पन्न

    पीएमपीला पुणेकरांची पसंती, प्रवासी संख्या दीड कोटींनी वाढली, तिकीट विक्रीतून ६११ कोटींचे उत्पन्न

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रवासी संख्येत दीड कोटींनी वाढ झाली आहे. तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात साधारण ७८ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ‘पीएमपी’ची संचलन तूट कमी होण्यास मदत होणार आहे.पुणे, पिंपरी आणि ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत ‘पीएमपी’कडून साधारण १७०० बसच्या माध्यमातून सार्वजनिक सेवा दिली जाणार आहे. प्रत्येक वर्षी ‘पीएमपी’ची संचलन तूट वाढत आहे. यासाठी दोन्ही महापालिकांना अतिरिक्त पैसे द्यावे लागत आहेत. त्यात आता ‘पीएमआरडीए’कडूनदेखील वर्षाला १८७ कोटी रुपये दिले जातात. यंदाची रक्कम अद्याप मिळाली नसली, तरी ‘पीएमपी’ने ही रक्कम ‘पीएमआरडीए’कडे मागितली आहे. ‘पीएमपी’कडूनसुद्धा गेल्या आर्थिक वर्षात चांगली प्रवासी सेवा देऊन ‘पीएमपी’चे उत्पन्न वाढविण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच प्रवासी संख्या आणि उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

    गुडन्यूज! नवीन जलवाहिनीची चाचणी यशस्वी, लवकरच वाढीव पाणीपुरवठा, गुढीपाडवा गोड होणार

    म्हणून वाढले उत्पन्न

    ‘पीएमपी’चे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी उत्पन्न वाढविण्यासह तोटा कमी करण्यावर भर दिला. ब्रेकडाउन कमी करून जास्तीत जास्त बस मार्गावर कशा राहतील, याकडे लक्ष दिले. ‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांना मार्गावर फिरायला लावले. कमी उत्पन्न असलेल्या मार्गावर उत्पन्न वाढविण्याच्या जबाबदाऱ्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचा गेल्या आर्थिक वर्षात खूपच चांगला फायदा दिसून आला. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात सहा महिन्यांत प्रति किलोमीटर उत्पन्न ५०पेक्षा जास्त असल्याचे दिसून आले. ऑगस्ट महिन्यात तर एका महिन्यात सर्वाधिक ५७ कोटी रुपये उत्पन्न ‘पीएमपी’ला मिळाले होते.

    उत्पन्न कमी होण्याची शक्यता

    ‘पीएमपी’च्या ताफ्यातील बसची संख्या कमी होत आहे. येत्या काही महिन्यांत ‘पीएमपी’च्या २६६ बस संचालनातून बाद होणार आहेत. ‘पीएमपी’च्या मालकीच्या ३२७ बसला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या बस सतत बंद पडत आहेत. त्यामुळे मार्गावरील बसची संख्या कमी होणार आहे. नव्या ४०० बसची निविदाप्रक्रिया सुरू आहे; पण त्या बस प्रत्यक्ष ताफ्यात येण्यासाठी आणखी पाच ते सहा महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बसअभावी ‘पीएमपी’चे उत्पन्न पुन्हा कमी होण्याची शक्यता वरिष्ठ अधिकारी व्यक्त करीत आहेत.

    ~५३३ कोटी ४० लाख

    ‘पीएमपी’चे २०२२-२३ आर्थिक वर्षातील उत्पन्न

    ~३५ कोटी ५६ लाख

    ‘पीएमपी’चे २०२२-२३ आर्थिक वर्षातील प्रवासी

    ~६११ कोटी ६५ लाख

    ‘पीएमपी’चे २०२३-२४ आर्थिक वर्षातील उत्पन्न

    ~३६ कोटी ५० लाख

    ‘पीएमपी’चे २०२३-२४ आर्थिक वर्षातील प्रवासी संख्या

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed