• Sat. Sep 21st, 2024

पुणे विद्यापीठाच्या ‘पीएचडी’ मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण, लाच घेणाऱ्या गाईडवर कारवाई

पुणे विद्यापीठाच्या ‘पीएचडी’ मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण, लाच घेणाऱ्या गाईडवर कारवाई

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पीएचडीच्या प्रबंधात बदल करण्यासाठी विद्यार्थ्याकडे २५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शकावर (गाइड) लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केल्यामुळे, विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्तुळातील प्राध्यापकांचे धाबे दणाणले आहे. या कारवाईमुळे काही मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण केले जाते, हे स्पष्ट झाले आहे. या कारवाईची पुणे विद्यापीठाने दखल गंभीर दखल घेतली असून, यापुढे पीएचडी ट्रॅकिंग सिस्टीममध्ये विद्यार्थ्याला अशा गैरप्रकारांची थेट तक्रार नोंदवता येणार आहे.पुणे विद्यापीठात नोंदणीकृत मार्गदर्शकांची संख्या एक हजारच्या आसपास असून, त्यांचे कामकाज सुमारे २५० मान्यताप्राप्त संशोधन केंद्रांमधून चालते. पुणे विद्यापीठाच्या संशोधन केंद्रांमधून पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या साधारण १३ हजारांच्या जवळपास आहे. दरवर्षी साधारण दीड हजार विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी प्रवेश मिळतो. त्यामुळे पीएचडी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी चुरस असते. कमी खर्चात पीएचडीचे शिक्षण पूर्ण होत असल्याने, अनेक विद्यार्थी ‘पेट’ परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी तयारी करतात. या विद्यार्थ्यांचा पुढे जाऊन प्रवेश होतो. मात्र, काही मार्गदर्शकांना पैसे कमविण्याची संधी वाटते. त्यामुळे संशोधन प्रकल्पाच्या थिसिसची सुरुवात होण्यापासून ते शेवटच्या ‘व्हायवा’च्या टप्प्यापर्यत मार्गदर्शकाकडून विद्यार्थ्याला पैशांची मागणी करण्यात येते.
पीएमपीला पुणेकरांची पसंती, प्रवासी संख्या दीड कोटींनी वाढली, तिकीट विक्रीतून ६११ कोटींचे उत्पन्न
आतापर्यत हे प्रकार सर्रास व्हायचे. मात्र, आपली पीएचडीच्या शिक्षणाला बाधा नको किंवा ती पूर्ण होणार नाही, या भितीने विद्यार्थी लेखी तक्रार करण्याला घाबरायचे. याचाच पुरेपूर फायदा काही मार्गदर्शकांनी उचलला असून, त्यांच्याकडून विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण करण्यात आले आहे. या प्रकाराची पुणे विद्यापीठाने तत्काळ दखल घेतली आहे. त्यानुसार पीएचडी ट्रॅकिंग सिस्टीममध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शकांची तक्रार ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. मार्गदर्शककाडून विद्यार्थ्याला पैसे मागण्यासोबतच कोणत्याही प्रकारचा जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत असल्यास, त्याची तक्रार थेट पीएचडी प्रवेश किंवा प्र-कुलगुरू यांच्याकडे करता येणार आहे. या सिस्टीमची सुरूवात येत्या आठवड्यात करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

गलेलठ्ठ पगार घेऊनही…

पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शकांना साधारण एक लाख ते तीन लाखांपर्यंत महिन्याला पगार आहे. असे असतांनाही काही मार्गदर्शक विद्यार्थ्याचे पीएचडीचे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी लॅपटॉप, मोबाइल, घड्याळ, कॅमेरांसारख्या महागड्या वस्तूंची मागणी करतात. काही मार्गदर्शक थेट शुल्काप्रमाणे विद्यार्थ्याकडून पैसे वसूल करतात.

महागड्या हॉटेलात पार्टी?

नगर किंवा नाशिक जिल्ह्यातील काही मार्गदर्शक पुण्यात आले, की त्यांची राहण्यापासून खाण्यापिण्याची बडदास्त विद्यार्थ्याने राखायची, असे प्रकार सुरू आहेत. एका मार्गदर्शकाने तर त्याच्या कुटुंबियांसाठी आणि मित्रमंडळींसाठी महागड्या हॉटेलात पार्टीचा बेत आखला होता. आपली पीएचडी पूर्ण होणार नाही, या भीतीने अशा प्रकारांची तक्रार करण्यासाठी विद्यार्थी पुढे आले नाहीत. मात्र, लाचलुचपत प्रबंधक कार्यालयाने कारवाई केल्यामुळे विद्यार्थी तक्रार देण्यास पुढे येतील, अशी शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed