महायुतीसाठी शिवतारे यांचे बंड डोकेदुखी ठरले असते. पण अखेर घडले ते ही नियोजनाप्रमाणेच. शिवतारे यांनी कितीही त्रागा केला तरी ते निवडणूक लढवतील याबद्दल जनताच साशंक होती. तरीही त्यांनी पुरंदर, भोर, बारामती, इंदापूर, दौंडचा दौरा करत वातावरण निर्मिती सुरु ठेवली होती. विशेष म्हणजे रोज अजित पवारांवर जहरी टीका त्यांच्याकडून केली जात होती. बारामती लोकसभा मतदारसंघात ५ लाख ८० हजार मतदार पवार विरोधी आहेत, असा शोध त्यांनी लावला होता. या मतदारांना पर्याय आणि कोणतेच पवार नको म्हणून आपण निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले होते. ते कितीही जोरदार टीका करत असले आणि मतांचे गणित आखत असले तरी ते प्रत्यक्षात उभे राहतील का, याबद्दल साशंकता होतीच. त्यानुसारच सगळे घडत गेले. या सगळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी त्यांची चर्चा झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे आपण माघार घेत असल्याचे ते म्हणाले.पण त्यांच्या पदरात फारसे काही पडले नाही.ज्या अजित पवार यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली होती,त्यांचाच प्रचार आता त्यांना करावा लागणार आहे.
इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचीही हीच स्थिती झाली आहे. ज्या अजित पवार यांनी नेहमीच पाटील यांना खिंडीत गाठले, राजकीय कोंडी केली, त्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांचाच पाटील यांना आता प्रचार करावा लागेल. फडणवीस यांची तशी सक्त ताकीदच त्यांना मिळाली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील या दोन नेत्यांचे पेल्यातील वादळ आता शमले आहे. महायुतीच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी ते बळ देणारे ठरेल असे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात या नेत्यांनी कार्यकर्त्यांचीही मोठी कोंडी केली आहे. ते कार्यकर्ते व मतदार आता खरोखरच या नेत्यांचे ऐकतील का हे निकालातूनच दिसून येईल.