• Mon. Nov 25th, 2024
    आघाडीत बिघाडी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा देखील बुलढाण्यावर दावा

    बुलढाणा : लोकसभा निवडणुकीमुळे जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले असून दररोज नवनवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. दरम्यान महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हं दिसून येत आहेत. महाविकास आघाडीत बुलढाणा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे गेला असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देखील बुलढाणा मतदार संघावर दावा सांगितला जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राज्य कार्यकारिणी सदस्य रावसाहेब पाटील हे लोकसभेसाठी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असून आज त्यांनी पक्षाच्या आदेशावरुन उमेदवारी अर्ज घेतला आहे.ऐन उन्हाळ्यात लोकसभा निवडणूक लागली असून तप्त उन्हात जिल्ह्यातील राजकारणाचा पारा देखील वाढला आहे. बुलढाण्यात महाविकास आघाडी विरुध्द महायुती असा सामना रंगणार, असं मानले जात असले तरी दरारोज घडणाऱ्या नवनवीन राजकीय घडामोडींमुळे राजकीय संभ्रमावस्था निर्माण होत आहे. दोन दिवसांपूर्वीच महायुतीत महाभूकंप घडवत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचे निशान फडकविण्याचा प्रयत्न केला. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र आमदार गायकवाड यांचे बंड एका दिवसात थंड झाल्याचे दिसून आले.
    पदरात काहीच न पडता शिवतारे झाले थंड; ज्यांच्यावर जहाल टीका केली आता त्यांचाच प्रचार करणार

    आता महाविकास आघाडीत देखील बिघाडी होण्याची परिस्थिती दिसून येत आहे. महाविकास आघाडीत बुलढाणा मतदार संघ शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेलेला असून शिवसेनेनं प्रा. नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. येत्या एक-दोन दिवसात ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील बुलढाणा मतदार संघावर दावा सांगण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राज्य कार्यकारिणी सदस्य रावसाहेब पाटील यांना लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा निर्माण झाली आहे. त्यांनी आज बुलढाणा येथे जाऊन उमेदवारी अर्ज घेतला आहे. यावेळी त्यांनी काही माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आपण पक्ष आदेशानुसार उमेदवारी अर्ज घेतला असून एक-दोन दिवसांत अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले. यामुळे महाविकास आघाडीत नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रावसाहेब पाटील यांनी घेतलेल्या या भुमिकेमुळे महाविकास आघाडीत खळबळ माजली असून यावर आता पुढे काय निर्णय होणार हे बघावे लागणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed