• Sat. Sep 21st, 2024
अजित पवार यांना धक्का, नीलेश लंके यांचा आमदारकीचा राजीनामा, विखेंविरोधात नगरमधून लोकसभा लढणार

अहमदनगर : मी देव पाहिला नाही, पण देवासारखा श्रेष्ठ माणूस ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांमध्ये मी पाहिला. त्यांनी मला सांगितले की निलेश तूच लोकसभा निवडणूक लढ. पवार साहेबांच्या शब्दापुढे आमदारकी काय चीज आहे, असे भावनिक सुरात सांगून नीलेश लंके यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. अहमदनगर-पारनेर विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देताना ते प्रचंड भावुक झाले होते. फक्त पारनेरकर नाही तर अख्खा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आपल्या निर्णयाकडे डोळे लावून बसलाय. आता व्हायचं ते होऊ दे पण माघार घेणार नाही, असे सांगत नीलेश लंके यांनी शरदचंद्र पवार गटाकडून लोकसभा लढणार असल्याची घोषणा केली.आमदार नीलेश लंके यांनी शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुपे येथे कार्यकर्त्यांचा मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट घेतली. लोकसभा निवडणूक लढण्यासाठी शरद पवार गटात जाणे गरजेचे असल्याचे अधोरेखित करून त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवत असल्याचे सांगितले. इथल्या सर्वशक्तीमान सत्ताधाऱ्यांना हरवायचं असेल तर त्याआधी आपल्याला कटू निर्णय घ्यावा लागेल. आमदारकीचा राजीनामा देताना मला खूप वेदना होतायेत, जनतेने मला माफ करावे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी डोळ्यात अश्रू आणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही माफी मागितली.

विखेंच्या विरोधात लंके दोन हात करणार

नीलेश लंके यांच्या पत्नी राणीताई शेळके लोकसभा निवडणूक लढतील, अशी मतदारसंघात चर्चा होती. परंतु शरद पवार यांनी स्वत: लंके यांनी निवडणूक लढावी, अशी अट समोर ठेवली. त्यामुळे लोकसभा लढायची असेल तर राजीनामा देण्यावाचून लंके यांच्याकडे पर्याय नव्हता. अखेर आज राजीनामा देऊन स्वत: लंके हेच भाजपच्या सुजय विखे यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असतील, हे स्पष्ट झाले आहे.

आपल्याला कायदेशीर अडकायचं नाही. आता आपण अभिमन्यू आहोत. आपण चक्रवादळात अडकलो आहोत. तुम्ही मला पाच वर्षांसाठी निवडून दिलं. मात्र आता साडेचार वर्षे झाली आहेत. मात्र मी तुम्हाला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच मी राजीनामा देतोय, यासाठी मला माफ करा, पण इथल्या प्रस्थापितांविरोधात मी नेहमी लढेन. लोकसभेत जाऊन दूधदर, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव असे विषय मांडेन, असे लंके यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed