• Sat. Sep 21st, 2024
आंबेडकरांचा हल्लाबोल, राऊतांकडून प्रत्येक आरोपाला उत्तर, जागांचेही गणित समोर मांडलं!

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर देशातील विद्वान नेते आहेत. हुकूमशाहीविरोधात ते लढत आहेत. त्यांचा आम्हाला आदर आहे. आमच्या मनात त्यांच्याविषयी अजिबात किंतु परंतु नाही. फक्त भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत होईल, असे वागू नये, असा टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला. वंचितने आमच्यासोबत राहावे, एकत्रित निवडणुका लढवाव्या, अशीच आमची अजूनही भूमिका असल्याचे राऊत म्हणाले.

महाविकास आघाडीशी फारकत घेत प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी सकाळी आपले नऊ उमेदवार जाहीर केले. त्यानंतर संजय राऊत यांनी आंबेडकर यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भाजपला फायदा होईल असे पाऊल उचलू नये, अशी प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेनंतर आंबेडकरांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला. एक्सवर पोस्ट करून त्यांनी राऊत यांच्यावर सनसनसाटी आरोप करून प्रश्नांची सरबत्ती केली. त्याच पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी आंबेडकरांच्या आरोपांना सविस्तर उत्तरे दिली.
खंजीर खुपसणाऱ्या हातावर संजय राऊत लिहिलं, अकोल्यात पाडण्याचा प्लॅन, प्रकाश आंबेडकरांचं ट्विट

सगळे काही सकारात्मक होते पण….

उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले असे प्रमुख नेते जागा वाटपासंबंधी चर्चा करत होते. वंचितला आम्ही पहिल्या दिवसांपासून सन्मानाने वागवलं. त्यांना ४ जागांचा प्रस्ताव होता. अकोल्यासह ३ जागा हा आमचा प्रस्ताव होता. त्यामध्ये आम्ही आमची रामटेकची विद्यमान जागाही देणार होतो. काँग्रेसही एक जागा देणार होते. अतिशय सकारात्मक चर्चा होत होती. ही चर्चा महाविकास आघाडीतील नेते आणि त्यांच्यात होत होती, केवळ मीच त्यात होतो, असे नाही. दोन दिवसांपूर्वी तर आम्ही त्यांना पाच जागा देऊ, असेही सांगत होतो, असे सांगत सगळे काही सकारात्मक असूनही आंबेडकरांनी वेगळी भूमिका घेतल्याचे राऊत यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले.
शिवसेनेने युतीचा धर्म पाळला नाही, जागावाटपावरून प्रकाश आंबेडकरांनी साधला ठाकरे गटावर निशाणा

भाजपला अप्रत्यक्ष मदत होईल, असे कुणी वागू नये

जे लोक संविधान संपवू पाहतायेत, त्यांना अप्रत्यक्ष मदत होईल, असे कुणी वागू नये. आमची चर्चा अत्यंत चांगल्या वातावरणात होत होती. बाळासाहेब आंबेडकर हे आम्हा सगळ्यांना प्रिय आहे. वंचित आजही आमच्यासोबत हवी, अशीच आमची भूमिका आहे. वंचित-सेना युती आधी झाली होती, तेव्हा ठाकरेंनी युती केली ना… अकोल्याची जागा शिवसेनेकडे नाही, त्या जागेवर आम्ही कशाला चर्चा करू? तसेच सिल्वर ओकवर आतापर्यंत जागा वाटपावर कधीही चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीची रणनीती आणि तिन्ही पक्षातील समन्वयविषयी सिल्वर ओक आणि मातोश्रीवर चर्चा झाली, असे म्हणत आपल्यावरील आरोप संजय राऊत यांनी फेटाळून लावले.

आमचं जागावाटप महाराष्ट्रात होतं, दिल्लीला जावं लागत नाही; राऊतांचा टोला

वंचितला आपण कोणत्या जागा देणार होतात?

वंचितला आपण कोणत्या जागा देणार होतात? या प्रश्नावर राऊत म्हणाले, “बंद खोलीत ज्या चर्चा झाल्या त्या आमच्यातच ठेवणार… शिवसेना त्याग करायला तयार होती. ते मोठे नेते आहेत, त्यांच्या विषयी किंतु परंतु नाहीत. ते आमच्यासोबत राहावेत, यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न केले”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed