• Mon. Nov 25th, 2024
    दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, गंभीर दुखापत, पुण्यातील रुग्णालयात उपचार

    पुणे : ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे राहत्या घरात पाय घसरून पडल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. ते आता पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून पुढील काही काळ त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

    याबद्दल स्वतः दिलीप वळसे पाटील यांनी माहिती दिली आहे. ‘काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल’, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप वळसे पाटील काल रात्री हे त्यांच्या राहत्या घरात पाय घसरुन पडले आहेत. यामध्ये खुबा आणि हाताला फ्रॅक्चर झाले आहे. यासंदर्भात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तर वळसे पाटील यांना पुढील काही काळ विश्रांती घेण्याचे देखील डॉक्टरांनी सांगितलं आहे.
    राजकारण: शिरुरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! अमोल कोल्हेंचं ठरलं, आढळराव घड्याळ बांधून मैदानात उतरणार?

    नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये दिलीप वळसे पाटील यांचं नाव देखील आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विभागल्यानंतर अजित पवार यांना साथ देणारे दिलीप वळसे पाटील यांचे महत्व हे या लोकसभा निवडणुकीत जास्त आहे. शिरूरच्या रणसंग्रामात तर वळसे पाटील हे बिनीचे शिलेदार आहेत. परंतु त्यांनाच दुखापत झाल्याने शिरूरमध्ये त्यांच्या प्रचाराची कमी अजितदादांना नक्की जाणवेल.

    शिवाजीराव आढळराव पाटलांचं ठरलं! २६ मार्चला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश निश्चित

    ऐन निवडणूक प्रचाराच्या धामधुमीमध्येच वळसे पाटील जायबंदी झाल्यामुळे हा राष्ट्रवादी काँग्रेसला एक मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांनी लढाई प्रतिष्ठेची केली आहे. अशात या मतदारसंघात वळसे पाटील यांची मोठी ताकद असल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील हा अजित पवारांना खूप मोठा धक्का मानला जात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *