• Thu. Mar 19th, 2026

    शासकीय उपहारगृहातील खाद्यपदार्थांचा दर्जा उंचावण्यासाठी आधुनिकता आणणार – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 13, 2026
    शासकीय उपहारगृहातील खाद्यपदार्थांचा दर्जा उंचावण्यासाठी आधुनिकता आणणार – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल – महासंवाद

    मुंबई, दि.१३ : शासकीय उपहारगृहातील खाद्यपदार्थांचा दर्जा उंचावण्यासाठी आधुनिकता आणली जावी. पदार्थांची पौष्टिकता, कॅलरीज, अन्नघटक यांची माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने निश्चित केली जावी. उच्चशिक्षित शेफ त्याचबरोबर आहार तज्ज्ञ ,प्रशिक्षित आचारी व कर्मचारी असे मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याकरिता तातडीने भरती प्रक्रिया राबवावी, या क्षेत्रातील उत्तम पद्धतींचा उपयोग मंत्रालय व शासकीय उपहारगृहातील गुणवत्ता वाढवण्यासाठी केला जावा, असे निर्देश राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

    विधानभवनात झालेल्या बैठकीस (दि. १२ मार्च) सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकज कुमार, शासकीय उपहारगृह महाव्यवस्थापक संतोष नवगिरे उपसचिव चंद्रकांत मोरे, कक्ष अधिकारी पांडुरंग राऊत आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    मंत्री रावल म्हणाले, मंत्रालयातील भोजनसाठी चौरस आहार गृह, नाश्ता व चहासाठी असलेले कॅन्टीन, विधान भवन, नवीन प्रशासकीय इमारत येथील उपहारगृहांमध्ये हायजिनिक स्वच्छ वातावरण निर्माण केले जावे. अभ्यागतांना येथील उपहारगृहाच्या सुविधा व नियमांची माहिती देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले, सीसीटीव्ही, स्वच्छतेसाठी डीप क्लीन तंत्र, अन्नपदार्थ बनविण्यासाठी आधुनिक उपकरणे यांचा वापर केला जावा. अन्नपदार्थ बनविण्याकरीता उत्तम दर्जाच्या अन्न धान्याचा वापर व्हावा.

    राज्यातील विविध प्रादेशिक विभागातील व्यंजनांचा समावेश आहारात असावा. त्याचबरोबर दुध व इतर दुग्धजन्य पदार्थ पुरवठादार यांच्याकडुन भेसळयुक्त पदार्थांचा पुरवठा होणार नाही, याची विशेष दक्षता अन्न व औषध प्रशासन विभागाच्या यंत्रणेमार्फत घेण्यात यावी. सर्व उपहारगृहांमधील कर्मचारी यांचे वेळोवेळी प्रशिक्षण घेण्यात यावे, असेही मंत्री रावल यांनी सांगितले.

    यावेळी सचिव पंकज कुमार यांनी उपहारगृहांच्या सुधारणांसाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. उपहारगृहांच्या प्रस्तावित सुधारणा, रिक्त पदे व पद भरतीची माहिती, तसेच मंत्रालयाच्या नवीन होत असलेल्या इमारतीतील उपहारगृहाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.

    ०००

    किरण वाघ/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed