• Sat. Sep 21st, 2024

राजकारण: कधीकाळी पवारांचा बालेकिल्ला, आता विजयासाठी संघर्ष; अहमदनगर लोकसभेत पुन्हा पवार विरुद्ध विखे लढत

राजकारण: कधीकाळी पवारांचा बालेकिल्ला, आता विजयासाठी संघर्ष; अहमदनगर लोकसभेत पुन्हा पवार विरुद्ध विखे लढत

पूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अलीकडे त्यांना लोकसभेला यश संपादन करता आलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार गटाला तर हक्काचा उमेदवारही राहिला नाही. त्यामुळे भाजपकडून विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा उमेदवारही अद्याप जाहीर झालेला नाही. पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांना उपमुख्यमंत्री अजित पवार गटातून आपल्याकडे आणून उमेदवारी देण्याचा पवार गटाचा प्रयत्न आहे. त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. शेवटच्या क्षणी ही घोषणा होऊन या मतदारसंघात विखे पाटील विरुद्ध लंके अर्थात पवार विरुद्ध विखे पाटील अशीच लढत पुन्हा रंगणार आहे. अर्थात पवार कुटुंबातील एक सदस्य उपमुख्यमंत्री अजित पवार आता विखे पाटील यांच्यासोबत असणार आहेत. डॉ. विखे पाटील यांनी पुण्यात जाऊन अजित पवार यांची भेट घेतल्याने त्यांच्यातील वाद मिटल्याचे सांगण्यात येते.

काँग्रेसकडून भाजपकडे प्रवास


साखर सम्राट आणि पुरोगामी विचारांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या या मतदारसंघाचा प्रवास काँग्रेसकडून भाजपकडे झाला आहे. आतापर्यंत झालेल्या निवडणुकांत १० वेळा काँग्रेसचा खासदार झाला, तर चार वेळा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षाला प्रत्येकी एकदा संधी मिळाली. गेल्या तीन लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहिले, तर येथील मतदारांनी सतत भाजपला साथ दिल्याचे दिसून येते. सन २००९ मध्ये भाजपचे दिलीप गांधी विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी कर्डिले व अपक्ष उमेदवार राजीव राजळे यांचा पराभव केला होता. त्या वेळी राजळे यांचे बंड थांबविता न आल्याने राष्ट्रवादीची जागा गेली. त्यानंतर २०१४ मध्ये राष्ट्रवादीने दुरुस्ती करून राजीव राजळे यांनाच उमेदवारी दिली. मात्र, तेव्हाही भाजपच्या गांधी यांनीच विजय मिळविला. सन २०१९ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले डॉ. सुजय विखे पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यांनी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांचा पावणे तीन लाख मतांनी पराभव केला. तत्कालीन आघाडीकडून काँगेसमध्ये असलेले विखे इच्छुक होते. मात्र, पवार यांनी ताठर भूमिका घेत ना ही जागा काँग्रेसला सोडली ना विखेंना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. त्यामुळे गांधी यांच्याविरुद्धच्या नाराजीचा फायदा घेऊन जागा मिळविण्याची राष्ट्रवादीची संधी पुन्हा हुकली. तेव्हाही विखे विरुद्ध पवार असा सामना झाला होता.

वादानंतर भाजपचे ठरले

यंदा भाजपमध्ये डॉ. विखे यांच्याबद्दल नाराजीचे कारण पुढे करून आमदार राम शिंदे आणि भानुदास बेरड यांची नावे पुढे आली होती. मात्र, दुसऱ्या यादीत डॉ. विखे यांनाच उमेदवारी निश्चित झाली. त्यामुळे भाजपने आता प्रचाराला सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी वर्षभरापूर्वीच लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली. पवार यांनीही त्यांना आपला भावी उमेदवार म्हणून घोषित केल्याचे चित्र होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर लंके अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे पवार यांची पुन्हा पंचाईत झाली. पुढे ही जागा अजित पवार गटाला न सुटल्याने लंके यांचीही पंचाईत झाली. आता पवार आणि लंके यांना एकमेकांशिवाय पर्याय राहिला नसल्याचे चित्र आहे. याचाच अर्थ राधाकृष्ण विखे पाटील आणि शरद पवार हे पारंपारिक विरोधक पुन्हा समोरासमोर येणार.

या मुद्द्यांची चर्चा

अहमदनगरचे नामांतर, मराठा आणि धनगर आरक्षणाचे आंदोलन यांची राजकीय चर्चा होईल. मधल्या काळात तयारी करताना दोन्ही उमेदवारांनी सरकारी योजना आणि वैयक्तिक स्वरूपात मदतीचे काम केले आहे. लंके यांचे करोना काळातील काम, रस्त्यासाठीची आंदोलने, तर विखे पाटील यांचे केंद्र-राज्य सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम यावर प्रचारात भर दिला जाणार आहे. नगरमध्ये झालेले उड्डाणपुलाचे काम, महामार्गांची कामे, नगर-परळी रेल्वेचे काम, पाणी प्रश्न, कांद्यासह शेतीमालाचा भाव, नैसर्गिक अपत्ती आणि नुकसानभरपाई असे विविध प्रश्न, मुद्दे प्रचारात असतील.

लोकसभा २०१९ चा निकाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed