कोण आहेत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती?
शाहू महाराज छत्रपती हे राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचे पाइक आहेत.शाहू महाराज छत्रपती यांचा जन्म ७ जानेवारी १९४८ रोजी मुंबईत झाला. कोल्हापूर संस्थानचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू आणि मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांचे ते पुत्र आहेत. त्यांचे पूर्ण नाव शाहू शहाजी छत्रपती असून ते नागपूरच्या भोसले घराण्याचे दत्तक पुत्र आहेत. ते छत्रपती घराण्याचे वंशज आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर संस्थानाच्या समाजकार्याचा आणि विचारांचा वारसा तत्परतेने जोपासणे आणि त्यांचा प्रसार करण्याचे काम ते करत आहेत.
शिक्षण व विवाह
त्यांचे शिक्षण नागपूर आणि बंगळुरू येथील बिशप कॉटन हायस्कूलमध्ये पूर्ण झाले असून अर्थशास्त्र, इतिहास व इंग्रजी साहित्य या विषयात त्यांनी पदवी घेतली आहे. श्रीमंत शाहू महाराज यांना वाचनाची खूप आवड असल्याने त्यांच्या वाड्यात भव्य पुस्तकांचं ग्रंथालय देखील आहे. शाहू महाराज यांचा विवाह ९मार्च १९७० रोजी मंगसुळी (अथणी) येथील पवार परिवारातील याज्ञसेनीराजे यांच्याशी झाला आहे. त्यांच्या परिवारात युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराज मालोजीराजे छत्रपती असे दोन पुत्र आहे. दोघेही राजकारणात सक्रिय असून युवराज संभाजीराजे छत्रपती हे राज्यसभेचे माजी खासदार आहेत तर युवराज मालोजीराजे छत्रपती हे कोल्हापूर उत्तर विधानसभेचे माजी आमदार आहेत.
शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या गादीचे वारसदार आहेत. स्वातंत्र्यानंतर संस्थान खालसा झाल्यापासून शाहू महाराज यांची करवीर अधिपती अशी ओळख आहे. शेवटचे छत्रपती शहाजी महाराज यांनी आताच्या शाहू महाराज छत्रपती यांना नागपूरकर भोसले यांच्याकडून दत्तक घेतले. शाहू महाराजांना दत्तक घेतल्यानंतर कोल्हापुरात हे दत्तक प्रकरण खूपच गाजले होते. शाहू महाराजांना दत्तक म्हणून घ्यायला करवीरकरांचा विरोध झाला होता आणि त्यासाठी अनेक आंदोलन देखील झाल्याचे जुने जाणकार सांगतात. मात्र ते दत्तक आल्यानंतर आणि शहाजी महाराजांच्या निधनानंतर १९८४ ला सध्याचे शाहू महाराज छत्रपती गादीवर विराजमान झाले.
राजकारणाशी संबंध
शाहू महाराज छत्रपती हे सार्वजनिक जीवनात फारसे सक्रीय होत नव्हते. त्याचे कारण म्हणजे दत्तक प्रकरणावरून झालेला वाद. मात्र, १९९५ साली त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना शाहू महाराजांसह अनेक राजघराण्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शाहू महाराज छत्रपती यांच्यात घनिष्ठ संबंध होते. यामुळे १९९९ साली शाहू महाराजांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवावी असा आग्रह करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी शाहू महाराजांनी निवडणूक लढण्यास नकार दिला होता. त्यानंतर शाहू महाराज राजकारणापासून देखील अलिप्त राहिले. शाहू महाराज त्यानंतर कोणत्याही राजकीय व्यासपीठावर दिसले नाहीत. मात्र त्यांची सर्व राजकीय पक्षांची, संघटनाशी चांगले संबंध आहेत. कोल्हापुरात कोणताही राजकीय नेता आला तर शाहू महाराजांची भेट घेतल्याशिवाय जात नाही. त्याशिवाय कोल्हापुरातील अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये शाहू महाराजांचे मार्गदर्शन राजकीय नेते घेतात.
कोल्हापूरसाठी शाहू महाराजांचे योगदान
दत्तक प्रकरणानंतर शाहू महाराज छत्रपती सार्वजनिक जीवनात फार सहभागी होत नसत मात्र जिल्ह्यातील कोणत्याही विकासकामांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यामुळे आता कोल्हापूरकरांच्या मनात त्यांनी एक वेगळे स्थान निर्माण केले असून राजर्षी शाहू महाराज यांचे समतेचे विचार अनेक कार्यक्रमांतून ते राज्यभरात पोहोचवतात. शाहू महाराजांनी शहरातील अनेक विकास कामांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले असून शासकीय कार्यालय, मैदान, स्टेडियम उभे करण्यासाठी जागा खुली करून देण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
अलीकडे कोल्हापुरात दोन जातीमध्ये तेढ निर्माण झाल्याने मोठी दंगल उसळली होती. यावेळी शाहू महाराजांनी पुरोगामी विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि समतेचा संदेश देण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरत शिव शाहू सद्भावना रॅलीमध्ये सहभागी झाले होते. तसेच मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. तर शेतकरी नेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आठ तास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरत आंदोलन केले होते. त्यावेळी देखील शाहू महाराज यांनी महामार्गावर राजू शेट्टी यांची भेट घेऊन तोडगा काढण्याचा सल्ला दिला होता. तसेच ते शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचे देखील म्हणाले होते.
राजकारणात येण्याचा निर्णय
गेल्या काही वर्षात राज्यातील राजकारणात झालेले बदल आणि शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या पक्षफुटीनंतर शाहू महाराज यांनी पक्षांतरबंदी कायदा तसेच शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे यावर त्यांनी केलेली विधाने नेहमीच चर्चेत राहिली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेल्या बंडानंतर कोल्हापुरात शरद पवार यांनी घेतलेल्या सभेत शाहू महाराजांनी व्यासपीठावर पहिल्यांदाच उपस्थिती लावली होती. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शाहू महाराजांची भेट घेत अनेक विषयांवर चर्चा केली होती. यानंतर शाहू महाराजांनी अनेक कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्राच्या उद्योग धोरणाबाबत भाष्य करत सर्वच उद्योग गुजरातला पळवून नेले जात आहे आणि महाराष्ट्राच्या वाटेला काहीही ठेवलं जात नाही म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली होती.
दुसरीकडे भाजपकडून हिंदुत्ववादी कोल्हापूर म्हणून ओळख पसरवण्याच प्रयत्न होत असतानाच शाहू महाराजांनी मात्र शाहू, फुले, आंबेडकर यांचा समता, बंधुता आणि सर्वधर्मसमभावाचे पुरोगामी विचार कोल्हापुरात जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे शरद पवार यांनी शाहू महाराजांची भेट घेतली त्यांना महाविकास आघाडीमधून निवडणूक लढवण्याचा आग्रह केल्यानंतर शाहू महाराजांनी देखील निवडणूक लढण्यास होकार दिला. आता काँग्रेसने शाहू महाराजांना उमेदवारी देत भाजपसमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. कोल्हापूरची निवडणूक ही पुरोगामी विचार विरुद्ध हिंदुत्ववादी प्रचार अशी होणार आहे.