• Sat. Sep 21st, 2024
भरधाव कारची धडक अन् कुटुंबाचा आधार गेला, होळीच्या दिवशीच वडिलांचा मृत्यू

बुलढाणा: होळी आणि रंगपंचमीचा उत्सव सर्वत्र धुमधडाक्यात सुरू असताना बुलढाण्यात मात्र एक दुर्दैवी घटना घडली आहे. दुचाकी अपघातात पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात स्मशान शांतता पसरली आहे. शेतातील काम आटोपून घरी जाणाऱ्या पिता-पुत्राच्या दुचाकीला भरधाव वेगातील चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. यात पित्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचाराकरिता संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.

ऐन होळीच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील हतेडी खुर्द शिवारानजीत ही दुर्घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शिवाजी म्हातारजी चव्हाण (वय वर्ष ५५) असे मृत पित्याचे नाव आहे. विशाल शिवाजी चव्हाण (वय वर्ष २८) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

सध्या समृद्धी महामार्गाबरोबर राज्य महामार्ग देखील गुळगुळीत झाले आहेत. कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अंतर कापणे याची स्पर्धा लागलेली असते आणि यामध्येच असे अपघात मागील काही दिवसात समोर येत आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दोघं पिता-पूत्र केसापूर येथील शेतातील काम आटोपून घरी माळविहीरकडे निघाले होते. मात्र, मध्येच एका कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली. यात शिवाजी म्हातारजी चव्हाण यांना डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशाल गंभीर जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. विशाल चव्हाण याला तात्काळ उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. चालक प्रमोद जय नारायण तुपकर (रा. काँग्रेस नगर , बुलढाणा ) याच्याविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. होळीच्या उत्सवाच्या रंगात अचानक झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे आणि गावात स्मशान शांतता पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed