• Sat. Sep 21st, 2024
पार्ट्या न् ‘फास्ट मनी’चा मोह; मुंबईत नशेच्या दुनियेची भुरळ, ललित पाटील ड्रग्जमाफिया कसा बनला?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : मुंबईतील झगमगत्या पार्ट्या आणि अमली पदार्थांच्या विक्रीतून झटपट मिळणारे पैसे या दोन गोष्टींना भुलून ललित पाटीलने अमली पदार्थांची तस्करी करून ‘मेफेड्रोन’ची (एमडी) फॅक्टरी थाटल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. मुंबईतील एका पार्टीने ललितच्या जीवनाला कलाटणी मिळाली खरी; मात्र यशाच्या शिखरावर जाण्याऐवजी तो गुन्हेगारीच्या दलदलीत अडकला.

तीन हजार पानांचे आरोपपत्र

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातून चालविण्यात येणारे ‘एमडी’ तस्करीचे रॅकेट उघडकीस आणले. त्यानंतर या प्रकरणात मोठमोठे खुलासे झाले. या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याने नाशिक येथे ‘एमडी’निर्मितीचा कारखाना सुरू केल्याची धक्कादायक बाब समोर आली. या प्रकरणी ललितसह चौदा जणांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या’नुसार, (मकोका) कारवाई करून ३१५० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

ललितची ‘नशेच्या दुनिये’त एंट्री

ललित पाटीलवर २०२०मध्ये चाकण पोलिस ठाण्यात अमली पदार्थ तस्करीचा गुन्हा दाखल झाला. तत्पूर्वी, त्याच्यावर एकही गुन्हा दाखल नव्हता. या काळात तो मुंबईतील एका ‘ड्रग पेडलर’सोबत पार्टीत गेला. तेथे त्याला ‘नशेच्या दुनिये’चे दर्शन झाले आणि तो मोहाला बळी पडला. त्यानंतर ललित ‘एमडी’ची तस्करी करू लागला. चाकणमध्ये अटक होऊन त्याची रवानगी येरवडा कारागृहात झाली. तेथे अरविंदकुमार लोहरे याच्याशी त्याची ओळख झाली. लोहरे केमिकल इंजिनीअर असून, त्याच्या मदतीने ललितने ‘एमडी’ उत्पादनाचा घाट घातला, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, ललितचे मुंबईतील पार्टीचे ठिकाण आणि संबंधित ड्रग पेडलरची माहिती पुणे पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला कळविल्याचे सूत्रांनी सांगितले.

भीती कुणाची कशाला? शहरात ‘एमडी’ची तोलूनमापून विक्री, कॉलेजच्या गेटवरच थाटलेलं दुकान
कारागृह प्रशासनावर प्रश्नचिन्ह

ललित पाटील येरवडा कारागृहात राहून ‘एमडी’ची निर्मिती आणि त्याचे वितरण अशी संपूर्ण व्यवस्था पाहत होता. तो कोठडीत असला तरीही अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट बिनदिक्कतपणे सुरू होते. यामध्ये त्याला सुरुवातीला कारागृह प्रशासनातील आणि नंतर ससून रुग्णालयातील अपप्रवृत्तींचा मोठा फायदा झाला. त्यांच्या मदतीने त्याला सर्व गोष्टी ‘मॅनेज’ करणे शक्य झाले.

प्रशासनातील अनेकांची मदत

या प्रकरणाची सखोल चौकशी पुणे पोलिसांनी केली. ललित पाटीलला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सहा पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खात्यातून बडतर्फ करण्यात आले. कारागृहातील आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना अटकही करण्यात आली. ससून रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापकालाही अटक झाली. ससूनचे तत्कालीन अधिष्ठाता अद्याप कारवाईपासून लांब आहेत. त्यांच्यावरील कारवाईसाठी राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे मंजुरी मागण्यात आली असून, त्यावर कार्यवाही झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed