गेल्या सत्तर वर्षांपासून टाटा मोटर्स, बजाज या कंपन्यांनी पुण्याला ऑटोमोबाइलचे निर्मिती केंद्र म्हणून ओळख मिळवून दिली. या मुळे पुणे जिल्ह्यात ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी आवश्यक असलेली कौशल्ये इथल्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिकवली जाऊ लागली. त्याचाच प्रभाव परदेशी कंपन्यांवर पडला असून, आता परदेशी ब्रँड्सला आवश्यक असलेले सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्याही पुण्यात मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या आहेत. यामुळे पुणे ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी सर्वार्थाने अनुकुल ठरत असून, कुशल मनुष्यबळ आणि सुट्या भागांची मुबलक उपलब्धता यामुळे बहुतांश परदेशी कंपन्या इथेच आपले प्रकल्प सुरू करीत असल्याचे ऑटोमोबाइल क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.
इतर परदेशी ब्रँड्सचीही पसंती
पुण्यात आता केवळ ऑटोमोबाइल क्षेत्रातील परदेशी ब्रँड्स आपली निर्मिती करीत नसून बास्किन अँड रॉबिन्स, बेंटलर ऑटोमोटिव्ह, नेस्ले अशा इतर क्षेत्रांतील कंपन्यांनीही आपले प्रकल्प पुणे जिल्ह्यात सुरू केले आहेत. या कंपन्यांची उत्पादने संपूर्ण दक्षिण आशियायी देशांना पुरवली जात असल्याने पुणे केवळ देशातच नाही, तर आशिया खंडासाठीही महत्त्वाचे केंद्र बनले आहे.
गेल्या सत्तर वर्षांपासून पुण्यात ऑटोमोबाइल कंपन्यांनी निर्मितीला सुरुवात केली. कालांतराने इथले अनुकूल वातावरण बघून परदेशी कंपन्या इथे येऊ लागल्या. सध्या पुण्यात शैक्षणिक संस्था, कुशल मनुष्यबळ आणि सुट्या भागांची सहज उपलब्धता आहे. यामुळे पुणे या कंपन्यांसाठी अतिशय उपयुक्त केंद्र आहे. भविष्यातही अनेक कंपन्या इथे येतील, यात शंका वाटत नाही.
– अनंत सरदेशमुख, अभ्यासक, ऑटोमोबाइल क्षेत्र