बाजारामध्ये पारंपरिक पद्धतीच्या पिचकाऱ्यांपासून म्युझिकल पिचकाऱ्या, मोठ्या बंदुकांसारख्या पिचकाऱ्या यांची चलती आहे. आदल्या वर्षीची पिचकारी पुढच्या वर्षी स्वरूप बदलून येते आणि मग लहान मुलांसोबत पालकांनाही ती पिचकारी हवीशी वाटते. या पिचकाऱ्यांचे रंग, आकार यामुळे मोठ्यांचे नाते बालपणाशी जोडले जात असल्याने पिचकाऱ्यांची हमखास खरेदी होते.
सोमवारी येणाऱ्या धुलिवंदनासाठी गल्ल्यांमध्ये लहान स्टॉलवर पिचकारी आणि रंगांची विक्री सुरू झाली आहे. दोनशे-अडीचशे रुपयांपासून पाचशे ते सातशे रुपयांपर्यंतच्या पिचकाऱ्याही बाजारात मिळत आहेत. अगदी लहान मुलांसाठी साबणाच्या फुग्यांच्या पिचकाऱ्याही उपलब्ध असून यातील वैविध्यही ग्राहकांना आकर्षित करून घेत आहे.
होळी आणि धुलिवंदनाला प्लास्टिकच्या पिशव्या फेकण्यावर बंदी असली तरी शुक्रवार दुपारपासूनच या लहान पिशव्याही रस्त्यांवर पडलेल्या पाहायला मिळाल्याचे निरीक्षण काही मुंबईकरांनी नोंदवले. तीन दिवसांच्या सलग सुट्ट्यांमुळे रविवारी दुपारपर्यंत हे चित्र कायम राहील, अशी शक्यता आहे.
अनोख्या रंगांची, अनोखी होळी…
अस्थिव्यंग मुलांसाठी चालविल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या आग्रीपाडा येथील एस. ई. सी. डे स्कूलमध्ये शुक्रवारी होळी आणि धुळवड साजरी करण्यात आली. यावेळी पारंपरिक पद्धतीने छोटेखानी होळीचे दहन करून विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकमेकाला रंग लावून होळीचा आनंद लुटला
कार्यशाळांचे आयोजन
धुलिवंदनाच्या सणाचा आनंद घेण्यासाठी मुंबईमध्ये विविध संस्थांनी पर्यावरणस्नेही रंगांच्या कार्यशाळांचे आयोजन केले होते. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या माध्यमातूनही अलीकडेच अशी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये ज्या झाडांपासून हे नैसर्गिक रंग तयार करता येतात त्यांचीही ओळख करून देण्यात आली.
निसर्गातील बदल
-काही पर्यावरणतज्ज्ञांनी वसंत ऋतूच्या आगमनाच्या निमित्ताने निसर्गामध्ये होणारे बदल टिपण्यासाठी निसर्गभ्रमंतीचेही आयोजन केले आहे. निसर्गामध्येही वसंत ऋतूच्या निमित्ताने रंगांची उधळण होत असते. निसर्गातील हा बदल समजून घेण्यासाठी झाडे, वेली, खुरटी झुडुपे, पक्षी, फुलपाखरे, किटक यांचे निरीक्षणही आवश्यक असते, असे पर्यावरणतज्ज्ञ आणि स्प्राऊट्स या संस्थेचे संचालक आनंद पेंढारकर यांनी सांगितले.