महाविकास आघाडीत चंद्रपूरची जागा काँग्रेस लढणार हे निश्चित आहे. बाळू धानोरकर यांच्यानंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या; प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा दाखविली आहे. आपण कामाच्या बळावर उमेदवारी मागत असल्याचे त्या सांगत आहेत. दिल्लीत उमेदवारीसाठी खलबते सुरू आहेत. वडेट्टीवार यांनी आपल्या लेकीसाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे विनंती केली आहे तर धानोरकर यांनीही आपल्यालाच उमेदवारी मिळाली, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे.
वडेट्टीवार समर्थकांकडून इतिहास सांगत धानोरकरांना प्रत्युत्तर
धानोरकर यांच्या उमेदवारीसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी प्रचंड घोषणाबाजी करून विजय वडेट्टीवार यांना गंभीर सवाल करणारे काही प्रश्न विचारले. त्यांच्या आरोपांना वडेट्टीवार यांच्या समर्थकांनी देखील पत्रातूनच उत्तर दिले आहे. स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर हे कुणबी समाजातील उमेदवार होते, त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेतला होता आणि निवडणूक प्रचारात सभा घेतल्या सर्वाधिक सभा घेतल्या. मग तेच वडेट्टीवार कुणबी विरोधक आहेत, असा प्रकार कसा काय सुरू झाला? इतकंच नाही तर स्वत: धानोरकर यांनी विजय वडेट्टीवार त्यांच्यामुळेच तिकीट मिळाल्याचं त्यावेळी सांगितलं. असे असताना आता विजय वडेट्टीवार यांना खलनायक ठरविण्याचं पद्धतशीर काम कसे सुरू झाले? असे सवाल करून वडेट्टीवार समर्थकांनी धानोरकर समर्थकांना उत्तर दिले आहे.
गड कायम राखण्यासाठी काँग्रेसची धडपड
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा ओबीसीबहुल आहे. वणी, आर्णी आणि वरोरा या तीन विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक कुणबी मतदार आहेत. धानोरकर यांच्या आकस्मिक निधनाने ही जागा नऊ महिन्यांपासून रिक्त आहे. हा गड कायम राखण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरू आहे. उमेदवारीसाठी स्पर्धा अधिक असली तरी महिला उमेदवार राहणार हे जवळपास निश्चित आहे.
ओबीसींचा मुद्दा प्रचारात गाजणार
या मतदारसंघात देशपातळीवरील मुद्द्यांबरोबरच राज्यातील राजकारण आणि स्थानिक मुद्दे चर्चेला येतील. मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनानंतर चंद्रपुरात २१ दिवस अन्नत्याग आंदोलन झाले. ओबीसी संघटना सक्रिय असल्याने समाजाचे प्रश्न अधिक प्रकर्षाने मांडले जातील. ताडोब्यातील पर्यटनसमृद्धीची उदाहरणे सांगताना मानव-वन्यजीव संघर्षात जीव गमावणाऱ्यांचे काय, हा प्रश्न अधिक प्रकर्षाने विचारला जाईल. उद्योगवाढीमुळे प्रदूषण, इरईमधील अतिरिक्त भार, शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा, कापूस आणि सोयाबीनचे कोसळलेले दर, धानाचा रखडलेला बोनस, पर्यटनस्थळांच्या विकासाकडे होणारे दुर्लक्ष हे मुद्देही जोडीला असतील. खुद्द राज्याचे वनमंत्री उमेदवार असल्याने त्यांच्या योजनांतील उणिवांवर बोट ठेवले जाईल.