• Mon. Nov 25th, 2024
    महायुतीतून गोडसेंना विरोध; यंदा पत्ता कट? लोकसभा उमेदवारीत भाजप काय करणार?

    शुभम बोडके, नाशिक : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवार अजून काही निश्चित झाले नाहीत. महाविकास आघाडीतील नाशिक लोकसभेची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडेच असणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र महायुतीत युतीधर्म बघता नाशिकची जागा ही विद्यमान खासदार हेमंत गोडसे अर्थात शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार, असे संकेत महायुतीतील नेत्यांनी दिले होते. महायुतीतील विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे उमेदवार नको अशा चर्चा मात्र वेग धरत आहेत. त्यामुळे गोडसेच उमेदवार असतील असे देखील खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशकात घोषणा करत स्पष्ट केले. नाशिकची जागा ही भाजप लढणार अशा चर्चा सुरू होत्या त्यामुळे नाशिकमधून भाजपचे इच्छुक उमेदवार देखील कामाला लागल्याचे पाहायला मिळत होतं. गोडसेंच्या नावाची घोषणा केल्यानंतर मात्र भाजपच्या इच्छुकांमध्ये नाराजीचे सूर उमटताना बघायला मिळाले.भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तर नाशिक भाजप कार्यालयात प्रभारींसमोर ठिय्या आंदोलनच केले. मात्र, सलग दोनदा अर्थात १० वर्ष हेमंत गोडसे हे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. विकास कामांची दखल घेऊन तिसऱ्यांदा उमेदवारी मिळेल असे देखील विद्यमान खासदार गोडसेंनी वारंवार सांगितले. मात्र स्थानिक पातळीवर गोडसेंची नाराजी अधिक असून त्यांना महायुतीतूनच विरोध मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
    लगेच बंद! व्हॉट्सअ‍ॅपवरील ‘विकसित भारत’ मेसेजवरुन निवडणूक आयोगाची मोदी सरकारला स्पष्ट सूचना

    एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बंडानंतर ठाकरेंचे सरकार पडताच थेट भाजपसोबत युती केली. मात्र शिंदेंसोबत जाणाऱ्या खासदारांमध्ये हेमंत गोडसे हे पहिले खासदार ठरले होते. नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर, नाशिक जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नाशिकमधील बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आज देखील ठाकरेंच्या सेनेत पाहायला मिळतात. मातोश्रीचा आदेश हा अंतिम, ठाकरेंचा निर्णय हा शिवसैनिकांचा निर्णय असल्याचं सांगत अनेक शिवसैनिक हे नाशिकमध्ये ठाकरेंसोबत असल्याचं पाहायला मिळत आहे.

    २०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीत ह्याच शिवसेनेने बाळासाहेबांशी गद्दारी केलेल्या भुजबळांना दोनदा पराभवाची धूळ चारली होती. २०१४ साली छगन भुजबळांचे पुतणे विद्यमान खासदार असलेले समीर चव्हाण यांना पराभव केले होते तर २०१९ ला खुद्द छगन भुजबळ यांनाच ह्याच शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी पराभव केले होते. मात्र ही ताकद नाशिकमधील शिवसेनेची असल्याचं स्पष्ट झालं होतं. मागील अनेक दिवसांपासून शिवसेनेची ताकद हे नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळते. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या भावनिक लाटेचा फटका हा थेट हेमंत गोडसेंना बसू शकतो. त्यामुळे नाशिक महायुतीची जागा ही धोक्यात असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर आहे. महायुतीत हेमंत गोडसेंना ठाकरेंनी जिल्हा परिषद लोकसभेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. सर्वसामान्य शिवसैनिकाला संधी देत शिवसेनेने अनेक शिवसैनिक आमदार, खासदार बनवले त्यातीलच गोडसे ही एक. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण बघता महायुतीत हेमंत गोडसेंना उमेदवारी दिली तर, महायुतीचा उमेदवार निवडून न येण्याची परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे.

    देशभर धार्मिक वातावरण असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना दिलेला राम मंदिराचा शब्द पूर्ण केला आहे. त्यामुळे नाशिक ही देखील रामभुमी आहे. नाशिकमध्ये सर्वसामान्य नाशिककर हे नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याची इच्छा व्यक्त करत आहे. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना महायुतीने संधी दिली तर, उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता, पक्षांची नावे मोर्चे बांधणी यावर माहितीचा नवा चेहरा निवडून येऊ शकतो असे देखील बोलले जात आहे. त्यामुळे हेमंत गोडसेंना उमेदवारी न देता नव्या चेहऱ्यांना महायुतीचा उमेदवार करावा अशी भूमिका भाजपने घेतली आहे.

    विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी देखील नाशिक लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार हा भाजपचा धक्का तंत्राचा वापर करून उमेदवार दिला जाऊ शकतो. अशी देखील चर्चा नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात रंगू लागल्या आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *