• Sat. Sep 21st, 2024
भंडाऱ्यातून पटोले, चंद्रपुरातून वडेट्टीवार? काँग्रेसची यादी जवळपास निश्चित, कोणाकोणाची नावं?

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या खास सरदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भंडाऱ्यातून, तर विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांना चंद्रपुरातून उमेदवारी देण्याचे निश्चित केल्याची माहिती आहे. त्यांना आज, गुरुवारपर्यंत संमती कळविण्यास सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बुधवारी दिल्ली येथे पार पडली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, के. वेणुगोपाल, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आदी यावेळी उपस्थित होते. छाननी समितीने पाठविलेल्या नावावर चर्चा करण्यात आली. त्यातून काही नावे अंतिम करण्यात आली.

काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा-गोंदिया मतदारसंघातून नाना पटोले, चंद्रपूरमधून विजय वडेट्टीवार, अकोल्यातून अभय पाटील, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, गडचिरोलीतून नामदेव किरसान, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, पुण्यातून रवींद्र धंगेकर, कोल्हापूरमधून शाहू महाराज, सांगलीतून विशाल पाटील यांची नावे जवळपास अंतिम करण्यात आल्याची माहिती आहेत. वडेट्टीवार हे मुलगी शिवानी हिच्यासाठी उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. श्रेष्ठींनी मात्र खुद्द वडेट्टीवारांनीच लढावे अशी भूमिका घेतली आहे. पटोलेंनी स्वत: लढावे अथवा चांगला उमेदवार सुचवावा अशा सूचना दिल्या आहेत. या दोघांनाही निर्णय कळविण्यास सांगितल्याचे वृत्त आहे.

नागपुरातून ठाकरे, रामटेकमधून बर्वे

नागपूर लोकसभा मतदारसंघातून आमदार विकास ठाकरे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. नागपुरातील काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी एकमताने त्यांच्या नावाची शिफारस केली होती. रामटेकमधून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे कळते. काँग्रेस नेते सुनील केदार हे बर्वे यांच्या नावासाठी आग्रही होते.

सांगलीवरून वादाची शक्यता

सांगली मतदारसंघ शिवसेनेने (उबाठा) मागितला होता. त्यासाठी रामटेकवरील दावा सोडण्याची तयारी दर्शविली. आता काँग्रेसने सांगली आणि रामटेक दोन्ही ठिकाणी उमेदवार ठरविल्याचे कळते. यावरून महाआघाडीत वाद होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरची जागा शाहू महाराजांनी आपल्या तिकिटावर लढावी असे ठाकरे गटाला वाटत होते आणि काँग्रेसलादेखील. काँग्रेसने आपल्याकडून शाहू महाराजांचे समोर केल्याने येथेही ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed