चिमुकल्यांना वेठीस धरणाऱ्या त्यांना मारहाण करणाऱ्या या विकृत प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागलीय. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.वाढती महागाई, संसाराचा गाडा हाकण्यासाठी पती पत्नी दोघे कामावर जातात. लहान मुलांची परवड होऊ नये त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून या चिमुकल्यांना पाळणा घरात ठेवले जाते. त्यासाठी पाळणा घर चालवणाऱ्यांना पैसे देखील दिले जातात. मात्र, त्यानंतर काही पाळणा घरांमध्ये या चिमुकल्या जिवाला मानसिक व शारीरिक त्रास देखील दिला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
डोंबिवलीत देखील असाच संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. डोंबिवली पूर्वेत राहणारे मंदार उगले व त्यांची पत्नी हे दोघेही कामावर जातात. त्यांची तीन वर्षाची मुलगी ही डोंबिवली फडके रोड येथील हॅपी किड्स डे केअर या पाळणाघरात असते. हे पाळणाघर प्रभुणे दाम्पत्य चालवतं. मुलांना सांभाळण्यासाठी हे दाम्पत्य साडेआठ हजार रुपये रक्कम उगले यांच्याकडून घेते.
गणेश प्रभुणे त्यांची पत्नी आरती प्रभुणे व राधा नखरे हे तिघे लहान मुलांचा सांभाळ करतात. उगले यांच्या मुलीसोबत आणखी अनेक लहान मुलं या पाळणाघरात सांभाळण्यासाठी ठेवले जातात. प्रभुणे दाम्पत्य व राधा नाखरे यांच्याकडून लहान मुलांना बांधून ठेवले जात होते. त्यांना मारहाण केली जात होती. त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता.
याचदरम्यान या पाळणा घरात साधना सामंत ही महिला देखील काम करण्यास गेली. तिने हा सगळा धक्कादायक प्रकार पाहिला तिने सुरुवातीला विरोध केला मात्र प्रभुणे दाम्पत्य काही ऐकत नव्हते. अखेर सामंत यांनी या सर्व प्रकारचा व्हिडिओ काढला हा व्हिडिओ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी कविता गावंड यांना दिला. कविता गावंड यांनी संबंधित पालकांना फोन करून सगळ्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी गावंड यांच्यासहीत रामनगर पोलीस ठाणे गाठले. सुरुवातीला पोलिसांनी तुम्ही चाईल्ड वेल्फेअरमध्ये जा, असं सांगत तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. मात्र, घटनेची माहिती एसीपी सुनील कुऱ्हाडे यांना मिळाली.
कुऱ्हाडे यांनी तात्काळ तक्रार दाखल करून घेण्यास सांगितले. त्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात गणेश प्रभुणे, आरती प्रभुणे या दाम्पत्यासह राधा नखरे या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र, या धक्कादायक घटनेमुळे डोंबिवलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. चिमुकल्या लहान मुलांना शारीरिक व मानसिक त्रास देणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.