गिरीष महाजनांनी काल अकलूज येथे मोहिते पाटील परिवारातील सदस्यांची भेट घेतल्यानंतर आणि मोहिते पाटील समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी मनधरणीसाठी त्यांनी साताऱ्यात जाऊन दोन्ही छत्रपतींची भेट घेतली. ही भेट सातारा लोकसभा निवडणुकीसंदर्भातच होती हे सर्वश्रुत आहे. पण पेच आहे उमेदवारीचा, जर उदयनराजेंना उमेदवारी दिली तर शिवेंद्रराजे प्रामाणिक काम करतील का? हा मोठा प्रश्न भाजपला पडला आहे. हा पेच सोडवण्यात महाजन यशस्वी ठरतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गिरीष महाजनांना संकटमोचक का म्हटलं जातं? वाचा…
१) गेल्या आठ महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मनोज जरांगे यांचं मराठा आंदोलन सुरु होतं. हे आंदोलन संपूर्ण देशभर चर्चेत आलं होतं. यात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची महाजनांनी यशस्वी मनधरणी केली होती.
२) पाच महिन्यांपूर्वी धनगर आरक्षण प्रश्नावरून यशवंत सेनेचे कार्यकर्ते उपोषणाला बसले होते. हे उपोषण तब्बल २१ दिवस चाललं होतं. शेवटी २१ दिवसांनंतर हे उपोषण सोडवण्यात गिरीष महाजनांना यश आलं होतं.
३) लोकायुक्त नेमणूकीसाठी आणि कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता देण्यात यावी, अशा अनेक मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दोनदा उपोषण केलं होतं. दोन्ही वेळेला अण्णांचं हे आंदोलन मागे घेण्यासाठी गिरीष महाजनांनी त्यांची यशस्वी समजूत काढली होती.
४) नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा लॉंग मार्च मुंबईकडे येत होता. तर तेही लाल बावट्याचं वादळ महाजनांनी मुंबईच्या वेशीवरच शमवलं होतं.
५) आता महाजनांची खरी परीक्षा साताऱ्यात असणार आहे. कारण या दोन छत्रपतींचं मनोमिलन करण्यात दस्तुरखुद्द शरद पवारांना सुद्धा अपयश आलं होतं.