पत्रकारांशी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या की, गेल्या अनेक वर्षापासून भाजपचा हाच अजेंडा आहे. जो आजपर्यंत स्पष्ट करत नव्हते तो आता पोटातला ओठावर आला. तो चंद्रकांत पाटलांच्या माध्यमातून त्यांनी ओठावर आणलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून शरद पवार यांना हरवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत, त्यात त्यांना यश येत नव्हते, हे त्यांनीच स्पष्टपणे कबूल केले आहे. भाजपची ही राजनीती अतिशय गलिच्छ आणि घाणेरडी आहे, अशी टीका सुळे यांनी केली.
शरद पवारांचा पराभव करणं हेच एकमेव ध्येय : चंद्रकांत पाटील
बारामती लोकसभेत मला आणि भाजप कार्यकर्त्यांना हिशेब चुकता करण्याची संधी मिळाली आहे. तसंच शरद पवार यांचा पराभव करणं, आमचं एवढं एकच ध्येय आहे. आम्ही आयुष्यभर राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो आणि आता राष्ट्रवादीच्या चिन्हाला आम्ही पाठिंबा देणार आहोत. त्यामुळे लोक आमच्यावर टीका करतात. पण राजकारणात तराजू लावून निर्णय घ्यावे लागतात. सध्या आम्हाला शरद पवार यांचा पराभव जास्त महत्त्वाचा वाटतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
दादांचा सख्खा भाऊ विरोधात, सुप्रिया सुळे म्हणाल्या…
दरम्यान काल श्रीनिवास पवार यांनी काटेवाडीत केलेले भाषण राज्यात चर्चेत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, श्रीनिवास दादा आणि शर्मिला वहिनी यांनी गेली अनेक वर्ष माझा प्रचार केलेला आहे. ते काल काटेवाडीत आपल्या जवळच्या लोकांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी स्वतःचे मन मोकळे केले. स्वतःचे मनही मोकळे करता येत नसेल, तर ते काय उपयोगाचे? आपल्या जवळच्या लोकांपुढे त्यांनी आपले मन मोकळे केले, एवढेच त्याबाबत बाबतीत मी म्हणू शकेल.
जुगार कंपन्यांकडून संस्कारी पक्ष देणगी घेतात
इलेक्टोरल बाँड (निवडणूक रोखे) हा अतिशय मोठा घोटाळा असून त्याची श्वेतपत्रिका केंद्र सरकारने आणली पाहिजे. कारण जे देशांमध्ये गॅम्बलिंग करत आहेत, जुगार खेळत आहेत अशा कंपन्या राजकीय पक्षांना देणग्या देतात आणि ते संस्कारी म्हणवून घेणारे पक्ष स्वीकारतात हे अतिशय दुर्दैवाचे आहे. ज्या कंपनीचा टर्नओव्हर ५०० कोटींचा आहे त्यांनी १३०० कोटींची देणगी देणे हा एक प्रकारचा मनी लॉन्ड्रींगचाच भाग आहे, त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सुळे यांनी केली.