• Mon. Nov 25th, 2024
    वयस्कर व्यक्तीची किंमत न करण्यासारखा नालायकपणा नाही, अजित पवारांचे सख्खे बंधू संतप्त

    बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन स्वतंत्र गट निर्माण झाले. या दोन गटांमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबरोबरच पवार कुटुंबियांतही द्विधा मनस्थिती होती. असे असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनीही ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. बारामती तालुक्यातील काटेवाडी या पवारांच्या गावात ग्रामस्थांबरोबर एक बैठक पार पडली. या बैठकीला श्रीनिवास पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी श्रीनिवास पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा असल्याचे जाहीर करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जळजळीत टीका केली.

    श्रीनिवास पवार म्हणाले की, ज्या साहेबांनी पंचवीस वर्षे मंत्री केले, चार वेळा उपमुख्यमंत्री केले. तरीसुद्धा काकांनी माझ्यासाठी काय केले असे म्हणायचे! असा काका मला असता तर, मी खुश झालो असतो, असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.. पवार साहेबांचे वय 83 झाले आहे. या वयात त्यांना सोडणे मला पटले नाही. मला काही व्यक्ती म्हणाल्या इथून पुढची वर्ष दादांची आहेत, साहेबांची नाही. हा विचार मला वेदना देऊन गेला. पुढच्या काही वर्षात दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्याला लाभ मिळणार आहे. म्हणून वय झालेल्या व्यक्तीची आपण किंमत करत नाही. यासारखा नालायक माणूस नाही, अशा जळजळीत शब्दात श्रीनिवास पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
    अजितदादांचं म्हणणं खरं ठरलं, सुप्रिया सुळेंच्या पाठीशी संपूर्ण पवार कुटुंब, सोशल मीडियावर ‘वटवृक्षा’चे रील्स
    बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे रविवारी (ता. १७) रात्री ग्रामस्थांसोबत श्रीनिवास पवार व शरयू फाऊंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी संवाद साधला. पुढे बोलताना श्रीनिवास पवार यांनी भाजपवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, भाजपने पवार साहेबांना संपवण्याचा खूप प्रयत्न केला. घरातला कुणीतरी फोडल्याशिवाय ते घर संपत नाही. हा इतिहास आहे. घर एक असेल तर ते संपवू शकत नाही. घरातला माणूसच घरच्यांना घाबरत नाही. माझे हे बोलणे रेकॉर्डिंग करत असाल तर.. मला देणे घेणे नाही.. तुम्हाला कोणाला पाठवायचे ते पाठवा.. मी कोणालाही घाबरत नाही.. मी कुणाकडेही लाभार्थी म्हणून जाणार नाही.. साहेब जर दहा वर्षांपूर्वीचे असते. तर त्यांनी काय केले असते हे तुम्हाला ठाऊक आहे. वय वाढले म्हणून तुम्ही वयस्कर माणसाला कमजोर समजू नका..

    पोराला घर सांभाळायला दिलं त्याने बापालाच घराबाहेर काढलं, श्रीनिवास पवारांनी अजितदादांचं सगळंच काढलं

    Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

    आपल्याला साहेबांना विजयी करायचं…

    आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. हा काळ संवेदनशील आणि दुःखदायक आहे. तुम्ही सर्वजण कुटुंबाचा भाग आहात. कोणाला विरोध करायचा नाही. कुटुंब म्हटलं की भांड्याला भांडं लागतं. पण आपल्या कुटुंबात कधी घडलं नाही, ते घडले आहे. आपण त्यावर मात करतो, तसा प्रयत्न करत आहे. आपल्या सगळ्यांच्या घरी वडीलधारी माणसं आहेत. आपली ओळख शरद पवारांमुळे आहे. पवार साहेबांचे विरोधकही त्यांचे नाव काढतात. पवार साहेबांनी आपल्यासाठी काय केलं हा प्रश्न विचारणे म्हणजे.. आई-वडिलांनी आपल्यासाठी काय केले असं.. म्हणण्यासारखा आहे. पवार साहेबांनी इतक्या वर्षात मात खाल्ली आहे का ‌? आपण त्याला कारणीभूत व्हायचं का..? आपण त्याला गालबोट लावायचं का..? कोणाला यश मिळतं हा मुद्दाच नाही.. आपणाला फक्त साहेबांना विजयी करायचं आहे.. असे थेट मत शर्मिला पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *