म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून मी उमेदवारी मागितली नाही, तर जनतेचीच तशी मागणी आहे. जनताच म्हणते तुम्ही उभे राहा. उमेदवारीबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय मला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली.आमदार संजय शिरसाट यांच्या दाव्यानंतर खैरे यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मी लगेचच कामाला सुरुवात केली. अन्य पक्षातून सातत्याने मला विचारणा झाली, मात्र मी कुठेही गेलो नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मी कडवट शिवसैनिक आहे. आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे. मी एकनिष्ठ शिवसैनिक आहे. कुठेही गेलो नाही आणि कुठेही जाणार नाही. मागील निवडणुकीत काही जणांनी मला पाडल्यावरही काम करीत राहिलो. पाच वर्षे काम केले. जनतेलाच वाटते मी पुन्हा निवडणूक लढवावी.’
पक्षाने अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली तर तुम्ही त्यांचा प्रचार करणार का, असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले, ‘मी पक्षाचा आदेश मानतो, पक्षाने सांगितले तर त्यांचा प्रचार करेन. दानवे यांना मी डावलले असते, तर ते आज एवढ्या उंचीवर गेले नसते. मी दानवे यांचा गुरु आहे. त्यांनी ते शुक्रवारी ‘मातोश्री’वर मान्यही केले आहे. ते मान्यही केले. त्यांची कोणतीही नाराजी नाही, आम्ही एकाच कुटुंबातील आहोत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मी कडवट शिवसैनिक आहे. आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे. मी एकनिष्ठ शिवसैनिक आहे. मागील निवडणुकीतील पराभवानंतरही मी काम करत राहिलो. जनतेलाच वाटते मी पुन्हा निवडणूक लढवावी.
– चंद्रकांत खैरे, माजी खासदार