तीन मतदारसंघांत दोन महिन्यांचा कालावधी
छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना मतदारसंघांमध्ये १३ मे रोजी मतदान होईल. या मतदारसंघांमध्ये राजकीय पक्षांना जवळपास दोन महिन्यांचा कालावधी प्रचार व राजकीय डावपेच आखण्यासाठी मिळणार आहे. सद्यस्थिती महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप झालेले नाही. निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता या घडामोडींना वेग येईल आणि लवकरच मराठवाड्यातील जागावाटप होण्याची शक्यता आहे.
२६ एप्रिल रोजी मतदार – हिंगोली, परभणी, नांदेड
७ मे – धाराशिव, लातूर
१३ मे रोजी मतदान – छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना
मराठवाड्यात अजूनही वेट अँड वॉच
गेल्या महिनाभरापासून मराठवाड्यासह राज्यातील मतदारसंघांमध्ये उमेदवारीबाबत विविध राजकीय पक्षांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. अजूनही सर्वच पक्षांची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका असून, आता या प्रक्रियेला पुढच्या दोन दिवसांत वेग येण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव हे आठ मतदारसंघ येतात. २०१९ च्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, परभणी आणि हिंगोली शिवसेनेने तर नांदेड, लातूर, बीड आणि जालना हे चार मतदारसंघ भाजपने जिंकले होते. या वेळी मात्र परिस्थिती बदलली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची महाविकास आघाडी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीसमोर आव्हान उभे करण्यासाठी क्रियाशील आहे. गेल्या वेळी छत्रपती संभाजीनगरमधून विजय मिळवलेल्या ‘एमआयएम’ने अजून पत्ते उघडलेले नाहीत.
दरम्यान, भाजपने दुसऱ्या यादीत जालना, बीड, लातूर आणि नांदेड येथील उमेदवारांची घोषणा केली. मात्र, उर्वरित जागांसाठी सत्ताधारी आणि सर्व आठ मतदारसंघांसाठी विरोधकांनी अजूनही ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. पक्षांतर्गत धुसफूस, महायुती आणि महाविकास आघाडीत जागा कुणाकडे जाणार याच्याच चर्चा अजून सुरू आहेत. त्यामुळे अजून मराठवाड्यातील राजकीय वातावरण लोकसभा निवडणुकीसाठी तापलेले नाही. पुढच्या काही दिवसांत उमेदवार निश्चित झाल्यानंतर राजकीय रणधुमाळीची सुरुवात होईल.