• Sat. Sep 21st, 2024

अल्पवयीन मुलांच्या गटात मारहाण, एकाचा मृत्यू, न्यायालयाचे मध्यरात्रीपर्यंत कामकाज, काय घडलं?

अल्पवयीन मुलांच्या गटात मारहाण, एकाचा मृत्यू, न्यायालयाचे मध्यरात्रीपर्यंत कामकाज, काय घडलं?

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: बेलापूर न्यायालयातील न्या. आवटे पी. पी. यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी मध्यरात्री पाऊण वाजेपर्यंत न्यायालयाचे कामकाज सुरू ठेवून, इतर न्यायालयांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे या न्यायाधीशांचे सर्वत्र कौतुक होत आहे.तुर्भे येथील सामंत विद्यालयासमोर बुधवारी दुपारी पाच ते सहा अल्पवयीन मुलांच्या गटाने दोन अल्पवयीन मुलांना मारहाण केली होती. यात एकाचा मृत्यू झाला होता, तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर एपीएमसी पोलिसांनी त्याच दिवशी सहा अल्पवयीन मुलांना हत्येच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. हे सर्व जण अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्यांना गुरुवारी दुपारी भिवंडी येथील बाल न्यायालयात हजर करण्यासाठी नेले होते. मात्र ताब्यात घेतलेल्यांपैकी विशाल गुलाब बारीया याचे वय २० वर्षे असल्याचे नंतर, त्याच्या जन्मतारखेवरून निष्पन्न झाले.

रेल्वे कर्मचाऱ्याचा खून, मुलाची बॉडी फ्रीजमध्ये, मुलगी गायब; ‘त्या’ व्हॉईस मेसेजनं गूढ वाढलं

त्यामुळे पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांना भिवंडी येथील बाल न्यायालयात हजर केले. मात्र विशाल अल्पवयीन नसल्याने त्याला २४ तासांच्या आत न्यायालयात हजर करणे बंधनकारक होते. त्यामुळे एपीएमसी पोलिसांनी आरोपी विशाल याला भिवंडी येथून रात्री ८ वाजता बेलापूर न्यायालयात हजर करण्यासाठी आणले. पोलिसांनी बेलापूर न्यायालयातील न्या. आवटे पी. पी. यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर, त्यांनी या हत्या प्रकरणातील आरोपीच्या पोलिस कोठडीवर सुनावणी घेण्यासाठी मध्यरात्री पाऊण वाजेपर्यंत कामकाज सुरू ठेवले.

मोक्का लागणाऱ्या कार्यकर्त्याला मी वाचवलं, पोलीस अधिकारी म्हणाले अशांना पाठिशी का घालता? : अजित पवार

यावेळी सरकारी वकील रितेश सोनटक्के यांनी पोलिसांतर्फे जोरदार बाजू मांडली. त्यामुळे न्या. आवटे यांनी या हत्या प्रकरणातील आरोपी विशाल याला १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. न्या. आवटे यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदर्श ठेवत मध्यरात्रीपर्यंत कामकाज सुरू ठेवून, इतरांसमोर आदर्श निर्माण केल्याची चर्चा न्यायालयीन वर्तुळात होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed