मुंबई दि. 16- : लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाव्दारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात दि.19 एप्रिल ते 20 मे, 2024 या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे.या निवडणुकीचीआदर्श आचारसंहिता आजपासून लागू झाली असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
मंत्रालय विधीमंडळ वार्ताहार संघ येथे लोकसभा निवडणूक 2024 बाबत माहिती देण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक(माहिती) डॉ.राहूल तिडके, उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना श्री. चोक्कलिंगम म्हणाले की, 18 व्या लोकसभेकरिता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिनांक 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधित एकूण सात टप्यांमध्ये मतदान पार पडणार असून 4 जून 2024 रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्रातपाच टप्प्यात होणार मतदान
भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च, 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 48लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघासाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात विदर्भातील 05 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 19 एप्रिल,2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 20 मार्च,2024 पासून सुरु होईल. दुसऱ्या टप्प्यात विदर्भ व मराठवाड्यातील 08 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 26एप्रिल,2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 28 मार्च,2024 पासून सुरु होईल. तिसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणातील 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 07 मे,2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 12एप्रिल,2024 पासून सुरु होईल. चौथ्या टप्प्यात खान्देश, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 13 मे,2024 रोजी मतदान घेण्यात येणार असूनयासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 18एप्रिल,2024 पासून सुरु होईल.पाचव्या टप्प्यात खान्देश व कोकणातील 13 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 20 मे,2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून यामध्ये मुंबई व ठाण्यातील मतदारसंघांचा सुध्दा समावेश आहे. यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 26 एप्रिल, 2024 पासून सुरु होईल. मतमोजणी दिनांक 04 जून, 2024 रोजी होणार आहे.
30-अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक
महाराष्ट्र विधानसभेच्या 30-अकोला पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून सुध्दा दुस-या टप्प्यात पोट निवडणुक घेण्यात येणार आहेत. या पोट निवडणूकीचे मतदान दि.26 एप्रिल,2024रोजी होणार असून त्यासाठीची नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दि.28 मार्च,2024 रोजी पासून सुरु होईल.
आदर्श आचारसंहिता
भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असल्यामुळे संपूर्ण राज्यात आजपासून तत्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. सदर आचार संहिता लोकसभेचे नवीन सभागृह गठित होण्याबाबतची संविधानिक अधिसूचना जारी होईपर्यंत लागू राहील. त्यामुळे उपरोक्त कालावधीत स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे व शासकीय वाहनांचा वापर, एकत्रित निधीतून शासकीय जाहिराती प्रसिध्द करणे, नवीन कामांची किंवा नवीन योजनांची घोषणा करणे, शासकीय सार्वजनिक/खासगी संपत्तीचे विद्रुपीकरण इत्यादीं बाबींवर निर्बंध लागू झाले आहेत.
आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत निवडणूक खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याकरीता राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उमेदवाराने नामनिर्देशन पत्र भरल्यापासून त्याच्या निवडणूक खर्चाची गणना सुरु करण्यात येईल. मात्र, नामनिर्देशन भरण्यापूर्वी निवडणूक प्रचारासाठीचे साहित्य खरेदी केलेले असल्यास व त्याचा वापर नामनिर्देशनानंतर केला गेल्यास त्या खर्चाचाही समावेश निवडणूक खर्चामध्ये करता येईल. लोकसभा निवडणुकीकरीता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा रु.95 लाख इतकी ठेवण्यात आलेली आहे.तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकरिता प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा रु.40 लाख इतकी आहे.
राजकीय पक्षांच्या व उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे या समितीकडून पेड न्यूज संदर्भातही प्राप्त होणा-या तक्रारींवर कार्यवाही करण्यात येते.
सर्व राजकीय पक्ष, प्रसिध्दी माध्यमे आणि शासकीय विभाग प्रमुख यांच्याबरोबर बैठका घेऊन त्यांना आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत राज्य व जिल्हास्तरावर माहिती देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्र/मतमोजणी केंद्रावर प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश मिळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून प्राधिकार पत्रे सुध्दा निर्गमित करण्यात येणार आहे. मात्र त्या साठीच्या शिफारशी माहिती व जनसंपर्क संचालनालया मार्फत विहित मुदतीत व प्रपत्रात सादर करावयाच्या आहेत.
तसेच आदर्श आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी “काय करावे किंवा करु नये”(“DOs & DON’Ts) ची प्रत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच, या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मॅन्युअल/हस्तपुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याशिवाय भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://eci.gov.inवर निवडणुकी संदर्भातील सर्व सूचनांचा तपशील उपलब्ध आहे. तसेच उमेदवारांनी दाखल केलेली शपथपत्रे व खर्चाचे तपशील वेळोवेळी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे https://ceo.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
मतदारांची संख्या
सन 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी असलेले मतदार व सद्यस्थितीत अद्ययावत मतदार यादीप्रमाणे असलेले मतदार यांचा तुलनात्मक तक्ता खालीलप्रमाणे आहे:-
अ.क्र. | तपशील | सन 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीचे मतदार | दि.23.01.2024 रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीतील मतदार | दि.15.03.2024 रोजी अद्यावत मतदारांची संख्या |
1 | पुरुष | 4,63,15,251 | 4,74,72,379 | 4,78,50,789 |
2 | महिला | 4,22,46,878 | 4,37,66,808 | 4,41,74,722 |
3 | तृतीयपंथी | 2,406 | 5,492 | 5,559 |
एकूण | 8,85,61,535 | 9,12,44,679 | 9,20,31,070 |
निरंतर मतदार नोंदणीचा अद्याप कार्यक्रम सुरु
निरंतर मतदार नोंदणीचा अद्याप कार्यक्रम सुरुआहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून त्या त्या टप्प्यातील उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या 10 दिवस अगोदरपर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र.6 मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील.
मतदार यादी अद्यावत व शुद्ध करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून सतत प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गत करण्यात आलेले प्रयत्न थोडक्यात पुढीलप्रमाणे आहेत :-
- मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांची घरोघरी भेट
जुलै-ऑगस्ट 2023 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घरोघरी भेटी देऊन मतदारांकडून अर्ज प्राप्त करुन घेतले तसेच भावी मतदारांची माहिती घेण्यात आली.
- विशेष संक्षिप्त पुनरिक्षण-2024
ऑक्टोबर-डिसेंबर 2023 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाची माहिती जनतेला यासाठी व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली. सुट्टयांच्या दिवशी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सहकारी गृह निर्माण संस्थांच्या पदाधिकारांच्या माध्यमातून शहरी भागांमध्ये अधिकाधिक मतदार जोडण्यात आले आहेत.
या कार्यक्रमांतर्गत मतदार जागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आले. इतर शासकीय विभाग, अशासकीय संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये व इतर यांच्या सहभागाने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत संदेश पोहचविण्यात आला.
- दिव्यांग मतदारांसाठी (PwDs) सक्षम ॲप
भारत निवडणूक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने “सक्षम” हे ॲप उपलब्ध करुन दिलेले आहे.त्या माध्यमातुन तसेच विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कालावधीत दिव्यांगांसाठी विशेष शिबिरे राबवून जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे. आजमितीस 5,99,166 इतक्या मतदारांची नावे त्यांच्या मागणीनुसार दिव्यांग मतदार म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत.
- फोटो साधर्म्य समान नोंदी (PSE) व भौगोलिक साधर्म्य समान नोंदी (DSE) तसेच मयत झालेल्या मतदारांची वगळणी – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फोटो साधर्म्य समान नोंदी (PSE) व भौगोलिक साधर्म्य समान नोंदी (DSE) तसेच मयत मतदारांच्या संदर्भात विशेष मोहीम राबवून मतदार यादीचे जास्तीत जास्त शुध्दीकरण करण्यात आलेले आहेत.
- वरील सर्व प्रक्रिया करताना वेळोवेळी राज्य व जिल्हा स्तरावर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत. तसेच, पत्रकार परिषदा घेऊन इत्यंभूत माहिती देण्यात आलेली आहे. तसेच, राजकीय पक्षांच्या बैठकांचे इतिवृत्त जतन करण्यात आलेले आहेत.
- दि.23.01.2024 रोजी अंतिमरित्या प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार याद्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
या सर्व प्रयत्नांमुळे मतदार यादी मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. मतदार यादी संदर्भातील ठळक बाबी पुढील प्रमाणे आहेत :-
- सन 2019 सालच्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येमध्ये अद्याप पर्यंत 34,69,535 इतकी वाढ झाली आहे.
- सन 2011 च्या जनगणनेनुसार 1000 पुरुषांमागे 929 महिला (Gender Ratio) असे प्रमाण आहे. त्या तुलनेत सन 2019 साली मतदार यादीतील महिलांचे प्रमाणे 911 इतके होते. याकरिता महिलांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या व त्यामुळे 2024 मध्ये या प्रमाणात 923 अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.
- 18-29 वर्षे वयोगटामधील नव मतदारांची संख्या 1,78,84,862 एवढ्या नवीन मतदारांची नोंदणी सध्याच्या मतदार यादीत झालेली आहेत.
- याशिवाय 1,18,199 इतक्या सेनादलातील (Service Voters) मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.
- या वर्षी मतदार यादीमध्ये एकूण 5,99,166 इतके दिव्यांग मतदार चिन्हांकित आहेत. त्यापैकी ज्या मतदारांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण 40% पेक्षा जास्त असेल अशा मतदारांपैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल.
- अद्ययावत मतदार यादीमध्ये 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 13,15,166 इतकी आहे. यापैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल. मतदार यादीतील अद्यावत आकडेवाडी नुसार त्यापैकी 52,908 मतदार 100 वर्षावरील आहेत.
मतदानाची टक्केवारी
सन 2014 व सन 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मतांची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.
लोकसभा निवडणूक | पुरुष % मतदान | महिला % मतदान | एकूण मतदान |
सन 2014 | 62.24 | 57.97 | 60.32 |
सन 2019 | 62.43 | 58.82 | 61.02 |
मतदान केंद्र :-
सन 2019 च्या तुलनेमध्ये मतदान केंद्रांच्या संख्येमध्ये पुढील प्रमाणे वाढ झाली आहे.
तपशील | लोकसभा -2019 | लोकसभा-2024 |
एकूण मतदान केंद्रे | 95,473 | 97,325 |
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक मतदान केंद्रासाठी 1500 इतकी कमाल मतदार संख्या निर्धारित करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकांच्या पूर्वी मतदारांच्या संख्येत झालेली वाढ विचारात घेऊन सहाय्यकारी मतदान केंद्रे तयार करण्यात येतात. आजमितीस भारत निवडणूक आयोगाकडे 778 सहाय्यकारी मतदान केंद्रांचे प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहे. आयोगाच्या मान्यतेनंतर ही अतिरिक्त सहाय्यकारी मतदान केंद्रे स्थापित करण्यात येतील. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या 98,100 वर जाण्याची शक्यता आहे.
आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था, व्हील चेअर वरील दिव्यांगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा व फर्निचर इ. किमान सुविधा (Assured Minimum Facilities), प्रसाधन सुविधा, इ. पुरविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर ठेवण्यात आलेली आहेत.
शहरी भागातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी राज्यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, इ. शहरांमध्ये एकूण 150 मतदान केंद्रे अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांची संकुले यामध्ये उभारण्यात आलेली आहेत.
निवडणुकीसाठी कर्मचारीवृंद
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी सुमारे 6.00 लाख इतका कर्मचारीवृंद नेमण्यात येणार आहे. तसेच पुरेसा पोलिस कर्मचारीवृंद तैनात करण्यात येणार आहेत.
प्रशिक्षण
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, समन्वय अधिकारी, सहायक खर्च निरीक्षक, क्षेत्रिय अधिकारी, पोलिस क्षेत्रिय अधिकारी, पोलिस अधिकारी/कर्मचारी, भरारी पथके, स्थायी पथके, व्हिडीओग्राफर/फोटोग्राफर, इ. चे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेले आहेत. तसेच, प्रत्यक्ष मतदानाकरिता नेमण्यात येणा-या मतदान अधिकारी/कर्मचा-यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
ईव्हीएम- व्हीव्हीपॅट (EVM–VVPAT)
राज्यामध्ये सर्व लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम- व्हीव्हीपॅट (EVM-VVPAT) चा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात एकूण 2.47 लाख बॅलेट युनिट (Bus), एकूण 1.45 लाख कन्ट्रोल युनिट(CUs)आणि एकूण 1.53 लाख व्हीव्हीपॅट(VVPATs)यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. या सर्व यंत्रांची प्रथम स्तरीय तपासणी (First Level Checking) पूर्ण करण्यात आली आहे. निवडणूक मतदान यंत्रांच्या संदर्भात मतदारांमध्ये जागृती आणि विश्वासार्हता निर्माण व्हावी या हेतूने मोठ्या प्रमाणात जनजागृती कार्यक्रम दि.29.12.2023 ते दि.29.02.2024 या कालावधीत राबविण्यात आला. सर्व जिल्ह्यांमध्ये गाव पातळीवर मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रत्यक्ष मतदान यंत्रांवर कसे मतदान करता येते तसेच ही प्रक्रिया कशी सुरक्षित आहे याची जनतेला माहिती देण्यात आली. या जनजागृतीचा कार्यक्रम यशस्वी ठरला असून जनतेने या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग घेतला आहे.
महत्त्वाचे आयटी ॲप्लिकेशन्स (IT Applications)
यंदाच्या निवडणुकीमध्ये विविध विषयांची प्रभावी अंमलबजावणी करता यावी व त्यावर नियंत्रण ठेवता यावे या हेतूने आयोगाने काहीआयटी ॲप्लिकेशन्स(IT Applications) विकसित केले आहेत. ते थोडक्यात पुढील प्रमाणे आहे.
- सी व्हीजिल (cVigil)
आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत प्राप्त होणा-या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी निवडणूक आयोगाने cVigilहे मोबाईल ॲप विकसित केले आहे. यामध्ये दक्ष नागरिकाला एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे सदर ॲपमध्ये छायाचित्र अथवा व्हीडीओ काढून तक्रार नोंदविता येणार आहे व त्यावर जिल्हा प्रशासन तसेच मुख्य निवडणूक कार्यालयाकडून तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे.
पात्र दिव्यांगांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हील चेअरची मागणी नोंदविणे इ. सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी हे आयटी ॲप्लिकेशन्स उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
- केवायसी Know Your Candidate App
मतदारांना त्यांच्या उमेदवाराबाबतचा तपशील त्यामध्ये त्यांच्या नावे असलेले गुन्ह्यांचा तपशील, उमेदवाराची माहिती, इ. माहिती पाहता येऊ शकते.
- ईएसएमएस ॲप ESMS App/
निवडणूक अधिक मुक्त व निष्पक्ष वातावरणामध्ये व्हावी यासाठी आचारसंहितेच्या कालावधीत राज्यातील विविध केंद्रशासनाच्या व राज्यशासनाच्या अंमलबजावणी यंत्रणांकडून बेकायदेशीर पैसा, दारु, अंमली पदार्थ व भेटवस्तू, मौल्यवान धातू, इ. गोष्टी जप्त करण्यात येणार आहे. या जप्तीची माहिती भारत निवडणूक आयोगास दरदिवशी ESMS App/ Portal वरुन कळविण्यात येत आहे.
1950 क्रमांकाची हेल्पलाईन
राज्यस्तरावर (State Contact Centre) तसेच जिल्हास्तरावर (District Contact Centre) स्थापन करण्यात आले आहेत. मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर 1950 या टोलफ्री क्रमांकाची सुविधा सुरु करण्यात येईल.
मतदानाची सज्जता
प्रत्यक्ष निवडणुकीच्या दृष्टीने लागणारी साधनसामुग्री आणि मतदान केंद्रावर पुरवावयाच्या सोयी सुविधांकरिता योग्य ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.
तरी निवडणुकीसंदर्भात निवडणूक यंत्रणेस सर्व प्रकारचे सहकार्य करावे. तसेच सर्व मतदारांनी निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन मतदान करावे, असे आवाहन श्री.चोक्कलिंगम यांनी यावेळी केले.
00000