• Sat. Sep 21st, 2024

Special Story: वसंत तात्यांची ताकद किती? त्यांच्यासमोर पर्याय कोणते? पुण्यातून ग्राऊंड रिपोर्ट

Special Story: वसंत तात्यांची ताकद किती? त्यांच्यासमोर पर्याय कोणते? पुण्यातून ग्राऊंड रिपोर्ट

पुणे : सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारे, प्रश्न सुटेपर्यंत राज्यकर्ते आणि प्रशासनाशी दोन हात करणारे, सामाजिक बांधिलकी जपून प्रसंगी पक्षनेतृत्वाविरोधी भूमिका घेणारे आक्रमक पण तितकेच भावनिक नेते वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची किंबहुना राज ठाकरे यांची साथ सोडून पक्षासोबतचा १८ वर्षांचा प्रवास थांबवला आहे. पक्ष सोडताना राज ठाकरे यांच्याविषयी कोणतीही तक्रार नाही असे स्पष्ट करत पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांवर आरोप करून त्यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे.मला लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती, माझी तयीरीही सुरू होती, परंतु तरीही माझ्याविरोधात पक्षनेतृत्वाकडे चुकीचे अहवाल दिले गेले, असे सांगत पुढची दिशा पुणेकर ठरवीतल, असे वसंत मोरे यांनी जाहीर केले. त्याचवेळी परतीचे दोर मी कापले आहेत, असा संदेशही त्यांनी राज ठाकरे यांना दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची पुढची राजकीय दिशा काय असेल? लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते कोणत्या पक्षात प्रवेश करतील? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
कंठ दाटला, डोळ्यात अश्रू… चुकीच्या लोकांच्या हातात शहराची सूत्रे, मनसे सोडताना तात्या भावुक

वसंत मोरे यांची ताकद किती?

वसंत मोरे हे २००७ पासून पुणे महापालिकेत नगरसेवक आहेत. प्रत्येक वेळी ते नवनवीन प्रभागांतून निवडून आलेले आहेत. कात्रजच्या दोन्ही बाजूकडील म्हणजे बालाजीनगरपासून अगदी आंबेगाव पठार ते खडकवासला विधानसभा मतदारसंघावर देखील वसंत मोरे यांचा प्रभाव आहे. इकडे वसंत मोरे यांना मानणारा मोठा मतदार आहे. हडपसर मतदारसंघात तर जवळपास २५ ते ३० हजारांचा मुस्लीम मतदार वसंत मोरे यांच्या मागे उभा आहे. याच मतदारांसाठी वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भोंगेविरोधी भूमिकेला समर्थन दर्शवलेलं नव्हतं. पुणे शहरातील काही भाग हा बारामती लोकसभेत तर काही भाग शिरूर लोकसभेत मोडतो. दोन्ही लोकसभेवर काही अंशी वसंत तात्या प्रभाव टाकू शकतात.
अखेरचा जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा… वसंत मोरे यांचा मनसेला रामराम, राज ठाकरेंना धक्का

वसंत मोरे कोणत्या पक्षात प्रवेश करू शकतात?

वसंत मोरे यांनी मनसेकडून मागील निवडणूक हडपसर मतदारसंघातून लढवली होती. त्यांनी जवळपास ३५ हजार मतदान घेतलं होतं. दरम्यान, पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. राष्ट्रवादीत फूट पडल्याने हडपसरचे स्थानिक आमदार चेतन तुपे हे अजित पवार गटात आहेत. त्यामुळे महायुतीतून जर विद्यमान आमदाराला म्हणजेच चेतन तुपे यांना जागा सोडायची म्हटलं तर योगेश टिळेकर यांना उमेदवारी मिळणार नाही. अशावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार हडपसरमध्ये असेल कारण हडपसरची जागा शिवसेना वा काँग्रेस पक्ष लढवणार नाही. त्यामुळे स्थानिक गणिते लक्षात घेऊन वसंत मोरे शरदचंद्र पवार गटात प्रवेश करू शकतात. त्यांच्यासारखा तडगा उमेदवार असल्याने तिथे निवडून येण्याची त्यांची शक्यताही बळावते. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते वसंत मोरे यांचे नेटाने काम करतील, शिवाय त्यांच्या स्वत:चंही काही मतदान असल्याने त्यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग सुकर होईल, जो मनसेत असताना झाला नाही.

दुसरीकडे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पुणे शहर संघटनेतील अनेक पदाधिकारी, नेत्यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने शरद पवार गटात काम करण्यास मोठी स्पेस आहे. वसंत मोरे यांची कामाचा माणूस म्हणून ओळख आहे. त्यांच्या आक्रमक बाण्याने आणि प्रभावी नेतृत्व कौशल्याने ते पुणे शहरात शरदचंद्र पवार गटात चांगली संघटना बांधू शकतात. शरद पवारही त्यांना चांगली ताकद देऊ शकतात. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविताना त्यांचा आक्रमकपणा, त्यातून त्यांना मिळणारी लोकप्रियता तसेच समाज माध्यमांवर त्यांचा असलेला वावर अशा सगळ्यामुळे त्यांना आणि पर्यायाने शरदचंद्र पवार गटाला फायदा होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed