तर दुसरीकडे महायुतीमध्ये हे वाद सुरू असतानाच आता महाडचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांचे नाव महाड येथील युवासेनेकडून भावी खासदार, असा उल्लेख करत चर्चेत आणण्यात आलं आहे. मात्र या सगळ्याचा विचार केल्यास महाविकास आघाडीचे अनंत गीते हे आजवर पाच वेळा खासदार राहिले आहेत. दहा ते पंधरा वर्षे ते केंद्रात मंत्री राहिले आहेत. रायगड लोकसभा हा कुणबी बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अनंत गीते यांच्यासमोर महायुतीकडून तगडा आणि अनुभवी उमेदवार असल्यास निभाव लागेल हे स्पष्ट आहे. भावनेच्या आधारे येथे उमेदवारी दिल्यास महायुतीला धोका होण्याची शक्यता अधिक आहे.
धैर्यशील पाटील हे रायगड जिल्ह्यात सुप्रसिद्ध आहेत. मात्र या लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. या ठिकाणी हे नाव फारसे परिचित नाही. तसेच महाड, पोलादपूर परिसरातही धैर्यशील पाटील हे कितपत चालतील याबाबत महायुतीच्या नेत्यांनीही विचार केला आहे. रायगडमध्ये शेकापचे वर्चस्व आणि प्राबल्य मोठं आहे. धैर्यशील पाटील हे शेकापमधून भाजपामध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे महायुतीकडून धैर्यशील पाटील हे उमेदवार राहिल्यास शेकापमध्ये त्यांचे असलेले संबंध त्यामुळे त्यांना शेकापकडून मोठी ताकद मिळू शकते, ही जमेची बाजू आहे.
पण एकंदरच तटकरे यांच्या तुलनेत धैर्यशील पाटील हे नाव रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी काहीसं नवीन आहे. विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या तुलनेत धैर्यशील पाटील यांचा या लोकसभा मतदारसंघातील संपर्क मर्यादित आहे. त्यामुळे महायुतीकडून धैर्यशील पाटील यांना उमेदवारी दिल्यास या गोष्टींचा विचार महायुतीला करावा लागेल. सुनील तटकरे यांचा २०१४ साली झालेल्या निवडणुकीत अनंत गीते यांच्यासमोर निसटता पराभव झाला. त्यानंतर २०१९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सुनील तटकरे हे दणदणीत विजयी झाले.
गेल्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना शेकापची खंबीर साथ होती तर महाड मधून काँग्रेसचे नेते, माजी आमदार कै. माणिकराव जगताप यांचीही भक्कम साथ त्यांना मिळाली होती. आता माणिकराव जगताप यांची सुकन्या स्नेहल जगताप या ठाकरे गटात आहेत. या वेळच्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही गोष्टी तटकरे यांच्यासोबत नसतील. रायगडमध्ये मोठे प्राबल्य असलेल्या असलेल्या शेकापचा सामनाही तटकरे यांना करावा लागेल. या काही अडचणी खासदार सुनील तटकरे यांच्यासमोर आहेत. पण राजकारणातील मुरब्बी असलेले खासदार सुनील तटकरे याही अडचणी निभावून नेऊ शकतात.
तसेच धैर्यशील पाटील यांच्या तुलनेत सुनील तटकरे यांचे नाव रायगड लोकसभा मतदारसंघात सगळ्यांनाच परिचित आहे. त्यांचा मोठा जनसंपर्कही आहे. इतकेच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्याचे ते यापूर्वी पालकमंत्री राहिले आहेत. त्यामुळे दापोली, मंडणगड, खेड आणि गुहागर या दोन्ही विधानसभा मतदारसंघातही त्यांचा मोठा संपर्क आहे. या सुनील तटकरे यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. या दोन्ही मतदारसंघातही सुनील तटकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मुंबई भांडुप येथील कुणबी समाजाच्या वसतिगृहाचा प्रश्न गेले कित्येक वर्ष ताटकळत होता. मात्र हा प्रश्न मार्गी लावून नूतन वास्तू उभी राहिली. यासाठी निधी देण्यामध्ये खासदार सुनील तटकरे यांचा मोठा पुढाकार आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत कुणबी समाजाची ही मोठी साथ तटकरे यांना मिळू शकते.
रायगड या लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये पेण, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड हे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. पेण विधानसभा मतदारसंघ हा भाजपच्या ताब्यात असून भाजपाचे रवीशेठ पाटील हे पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. तर गुहागरचा अपवाद वगळता सगळे विधानसभा मतदारसंघ हे शिवसेनेच्या ताब्यात आहेत. त्यामुळे हा लोकसभा मतदारसंघ महायुतीसाठी तूर्तास अनुकूल दिसत असला तरी महाविकास आघाडीच्या अनंत गीते यांच्यासमोर तगडा आणि तुल्यबळ उमेदवार कोण असणार यावरच विजयाची गणित ठरतील.