नाशिक लोकसभेची जागा महायुतीतील शिवसेनेच्या शिंदे गटाकडे कायम राहणार, की भाजपकडे जाणार याचा तिढा कायम आहे. अशा संदिग्ध वातावरणात शिवसेना शिंदे गटाने कार्यकर्ता मेळावा आयोजित करून जोरदार शक्तिप्रदर्शन करून एकनाथ शिंदे यांच्यामागे खंबीरपणे उभे राहिलेले नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
खासदार हेमंत गोडसे यांना मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. आपल्याला पुन्हा एकदा त्यांना दिल्लीत पाठवायचे आहे, असे आवाहन करताना त्यांनी गोडसे यांच्या उमेदवारीची कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा केली. प्रभू श्री रामाचा धनुष्यबाण आपल्याकडेच राहणार आहे. नाशिकमधून हेमंत गोडसे लोकसभेच्या रिंगणात असतील, आपणल्याला त्यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचे आहे, असे आवाहन श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले. हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
गेल्या काही दिवसांपासून ही जागा भाजपकडे जाण्याची चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर ही जागा शिवसेनेकडेच राहिल, अशी विनंती आपल्या भाषणातून खासदार हेमंत गोडसे यांनी केली. त्यांची विनंती मान्य करून नाशिकची जागेवर तोडगा निघाल्याचे सांगत हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा दिल्लीत पाठवा, असे आवाहन श्रीकांत शिंदे यांनी केले.
नाशिकमधून इच्छुक असलेल्या तसेच प्रचारालाही आरंभ केलेल्या शांतिगिरी महाराजांनी रविवारी (दि. १०) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने नाशिकचा ‘सस्पेन्स’ आणखी वाढला होता. परंतु आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्याने नाशिकचा तिढा सुटल्याचे बोलले जात आहे.